-->

सातारा: वाईत सहा दुकाने फोडली

चोवीस तासांत चोरटे गजाआड

वाई – येथील भाजी मंडई परिसरातील बिअर बार, औषध, खत व किराणा मालाची दुकाने, दूध डेअरी सोमवारी (दि. 22) रात्री फोडून चोरट्यांनी अंदाजे 50 हजारांची रोकड लंपास केली. अनेक महिन्यानंतर वाईत एकाच वेळी अनेक दुकाने फोडण्यात आल्याने खळबळ उडाली. वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 24 तासांत तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

शशिकांत येवले यांच्या आम्रपाली बिअर बार अँड रेस्टॉरंटचे शटर कटावणीच्या साह्याने उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 14 हजार 200 रुपये व दारूच्या दोन बाटल्या चोरल्या.या बारलगत सुशांत गोळे यांच्या साईकृपा कृषी केंद्राचेही शटर उचकटून 18 हजार रुपये, बिलाल इकबाल बागवान यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून 11 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.

यात्री निवासासमोरील श्रीपाद मेडिकल स्टोअरचे शटर चोरट्यांनी उचकटले. तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही. महागणपती पुलाजवळ अष्टविनायक फार्माचे शटर उचकटून सात हजार रुपये, यात्री निवासातील रामचंद्र भाटे यांच्या डेअरीचे शटर उचकटून चोरट्यांनी 300 रुपये रोख व अठराशे रुपयांचे आइस्क्रीमचे बॉक्‍स चोरून नेले.

चोरट्यांनी रात्री साडेदहा ते साडेबाराच्या दरम्यान ही दुकाने फोडली. श्रीपाद मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी गुरेबाजार झोपडपट्टीतून चार संशयितांना सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी सनी सुरेश जाधव (वय 26), अक्षय गोरख माळी (वय 20) व सागर सुरेश जाधव (वय 24) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 17 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या चोरट्यांवर वाई पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.