सातारा : संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी आणि श्रावणबाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी सातारा तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.
शेंद्रे (दि. 24 जानेवारी), अपशिंगे (27 जानेवारी), दहिवड (29 जानेवारी), तासगाव (31 जानेवारी), परळी (3 फेब्रुवारी), वडूथ (4 फेब्रुवारी), वर्ये (10 फेब्रुवारी), अंबवडे (11 फेब्रुवारी), कण्हेर (12 फेब्रुवारी), खेड (14 फेब्रुवारी), कोडोली (17 फेब्रुवारी), करंजे, सातारा (18 फेब्रुवारी), सातारा (20 फेब्रुवारी) व नागठाणे (21 फेब्रुवारी) येथे ही शिबिरे होणार आहेत.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनांसाठी कोर्ट फी स्टँप लावून अर्ज करावा. तलाठ्याचा रहिवास व उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा 21 हजार रुपये आणि दिव्यांगासाठी 50 हजार रुपयांपर्यंत), रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, विधवा असल्यास पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत, परितक्ता असल्यास ग्रामीण भागासाठी ग्रामविकास अधिकारी (तलाठी) व ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी तलाठी व कर निरीक्षक यांचे संयुक्त प्रमाणपत्र.
अनाथ असल्यास ग्रामसेवक व गटविकास अधिकारी वा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांनी साक्षांकित केलेला दाखला, वयाचा दाखला. दुर्धर आजार असल्यास सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, छाननी तक्त्यातील 1 ते 6 या मुद्द्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र या कागदपत्रांसह शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.