सातारा, दि.14 (प्रतिनिधी)
काळज (ता. फलटण) येथील अवघ्या दहा महिन्याच्या ओम भगत या चिमुकल्याला विहरीत फेकून त्याचा खून करून संशयित फरार झाला होता. संशयिताने जातान कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने व स्थानिक लोकांच्याकडून चुकीची माहिती मिळाल्याने संशयिताला पकडणे अवघड झाले होते.
मात्र, जिल्हा पोलीस दलाने मोठ्या कष्टाने व नियोजनाने अवघ्या दोन दिवसातच संशयिताच्या मुसक्या आवळून “कानून के हात लंब होते है’ हे दाखवून दिले होते. या तपास मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी बुधवारी प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
काळज येथील त्रिंबक दत्तात्रय भगत यांचा लहान मुलगा ओम (वय 10 महिने) याचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांची 11 पथके तयार करून तपास सुरू केला होता. तपास सुरू असतानाच पोलिसांना संशयिताविषयी माहिती मिळाली. ओमच्या आईवर शेजारच्या गावातील एका तरुणाचे एकतर्फी प्रेम होते.
तो तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. लोणंद पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तपास पथकाने प्रश्नांचा भडीमार केल्यावर त्याने ओमचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याने फलटण व परिसरातील तणाव निवळण्यास मदत झाली होती.
त्यामुळे या कारवाईत सहभाग घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, लोणंदचे सपोनि संतोष चौधरी, पुसेगावचे सपोनि विश्वजित घोडके, सपोनि नीलकंठ राठोड, उत्तम भापकर, भावीकट्टी,पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, नानासाहेब कदम,सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार महेश सपकाळ, तानाजी माने, शरद बेबले, जितेंद्र शिंदे, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर,गणेश कापरे, अविनाश चव्हाण,विशाल पवार, मयुर देशमुख, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत,संजय जाधव, गणेश कचरे, गणेश घाडगे, महिला पोलीस मोना निकम, नुतन बोडरे यांच्यासह लोणंद, पुसेगाव, फलटण, वाठार स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी केला.