सातारा : महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर जुलै महिन्यापासून केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे ही उपचार प्रणाली योजना अडचणीत आली होती. वित्त विभागाने यंदाच्या बजेटमध्ये प्रतिपूर्ती परताव्यासाठी संपूर्ण राज्यासाठी ११६२ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सातारा जिल्ह्याचे 46 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या उपचार योजनेने मोकळा श्वास घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2024- 25 या वित्तीय वर्षासाठी १६८७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातून ३११ प्रतिपूर्ती खर्चाचे प्रस्ताव प्रलंबित होते. राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी कोट्यवधी रुपये थकल्याच्या तक्रारी केल्याने आरोग्य उपसंचालकांवर ही सेवा सुरळीत ठेवण्यासंदर्भात ताण होता. सार्वजनिक रुग्णालय कोणत्याही रुग्णाला विनाउपचार पाठवत नाहीत. त्यामुळे ते आर्थिक भार घेऊनही वैद्यकीय उपचार देतात.
मात्र, या योजनेचा परतावा 45 दिवसांमध्ये मिळत नसल्याने या योजनेअंतर्गत उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयात नकार दिला जात होता. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये या उपचार योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची परवड होत होती. या योजनेतील रुग्णालयांचे प्रलंबित दावे देण्यासाठी हा निधी विस्तारित करण्यात यावा, हा निधी रुग्णालयांचे दावे दिल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र अर्थ व प्रशासनाचे सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय यांना सादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. दाव्यांसंदर्भामध्ये आरोग्य उपसंचालकांनी तात्काळ याबाबतची तरतूद करावी आणि ते तत्काळ निकाली काढावेत, असे आदेश वित्त विभागाकडून निर्गमित झाले आहेत.
निधी १५ दिवसांत जमा होणार
सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना निधी टंचाईच्या गर्तेत होती. मात्र, राज्य शासनाने याची तातडीने दखल घेत जिल्ह्याचे तब्बल 46 कोटी, कोल्हापूर जिल्ह्याचे 90 कोटी, सोलापूर जिल्ह्याचे 71 कोटी तर पुणे जिल्ह्याचे 115 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या त्या रुग्णालयांच्या खात्यावर तात्काळ जमा केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या योजनेला निधीची लागलेली घरघर आणि थांबलेले उपचार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.