सौ. मंगल देशमुख; व्यसनमुक्त महिला संघाचा उपक्रम
मेढा – नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा उत्सव. देवीची उपासना स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणात करतो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसल्या जातात; परंतु गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिला यापासून वंचित असतात. आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचा सन्मान, हीच खरी दुर्गा पूजा आहे, असे उद्गार व्यसनमुक्त युवती-महिला संघाच्या राज्य अध्यक्ष सौ. मंगल देशमुख यांनी काढले.
व्यसनमुक्त महिला संघाच्यावतीने आठ दिवसांपूर्वी संघटनेच्या महिलांना साड्या जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 300 हून अधिक साड्या जमा झाल्या. जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकरी नवदुर्गांचा सन्मान केला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावातील गोपाळ वस्तीतील नवदुर्गांचा सन्मान व्हावा, अशी विनंती जवळवाडीच्या सरपंच सौ. वर्षा जवळ यांनी संघटनेकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार जवळवाडी येथे गोपाळ वस्तीतील कष्टकरी महिलांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आल्या.
सौ. देशमुख म्हणाल्या, देवीच्या उपासनेची आपली संस्कृती आहे; परंतु आज व्यसनाधीनतेमुळे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. आई, बहीण, मुलगी, सून म्हणून प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायलाच हवा.
दरम्यान, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र पुरंदर तालुक्याच्यावतीने तुषार देशमुख यांनी जवळवाडी ग्रामपंचायतीला डायस भेट म्हणून दिले. ग्रामपंचायत सदस्या गीता लोखंडे, राजेंद्र निकम, आनंदराव जवळ, अरुण जवळ, बाबुराव जवळ, सुनील पाटणे, राजश्री पाटील, योगीता जवळ, राजू पवार, शामराव चव्हाण उपस्थित होते.