सातारा -दिव्यनगरी (ता. सातारा) येथे रियल इस्टेट एजंट संतोष उर्फ विठ्ठल जिजाबा सूळ (रा. आवाडवाडी, ता. सातारा) यांचा भरदिवसा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर जिजाबा सूळ (मूळ रा. आदर्की, ता. फलटण, सध्या रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी जीवन निकम, प्रमोद जाधव (पूर्ण नाव, पत्ते माहिती नाहीत) व अनोळखी संशयिताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संतोष सूळ हे मूळचे फलटण तालुक्यातील आदर्की या गावचे रहिवासी असून, त्यांनी 2007 साली आवाडवाडी येथे शंभर गुंठे जमीन खरेदी केली होती. ते पत्नी, मुलासह आवाडवाडी येथे राहात होते. ते गेली अनेक वर्षे रियल इस्टेट एजंट म्हणून साताऱ्यात काम करत होते. सूळ हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर ज्ञानेश्वर सूळ यांनी सकाळी सव्वानऊच्या सुमारास संतोष सूळ यांना फोन केला.
त्यावेळी संतोष यांनी कामात असल्याचे सांगून फोन कट केला. दरम्यान, दिव्यनगरी येथील एक वकील दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने निघाले असता, संतोष सूळ हे जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तातडीने ज्ञानेश्वर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी घटनास्थळी धाव घेत, संतोष यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी संतोष यांनी आपल्याला दोन संशयितांची नावे ज्ञानेश्वर यांना सांगितली.
त्यानंतर थोड्या वेळाने संतोष यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दिव्यनगरीकडे धाव घेतली. त्यावेळी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याप्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तपास करत आहेत.
एक अल्पवयीन ताब्यात
घटना घडल्यानंतर सातारा तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत होते. संतोष सूळ यांच्या भावाने काही नावे सांगितल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात संशयित म्हणून एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.