सह्याद्री हॉस्पिटलला दिल्या 20 ऑक्सिजन मशिन; उंडाळकर गटाचे योगदान
कराड (प्रतिनिधी) – माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या रयत संघटनेतील कोयना सहकारी बॅंक, शेती उत्पन्न बाजार समिती व शामराव पाटील पतसंस्था उंडाळे या संस्थेच्या वतीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुरू असणाऱ्या कोविड सेंटरला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर रयत संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला आहे.
त्याचे लोकार्पण प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, जिल्हा परिषद सदस्य व रयत संघटनेचे नेते ऍड. उदयसिंह पाटील, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीप चव्हाण, रयत संघटनेचे कार्यवाह धनाजी काटकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, शामराव पंतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील व मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, करोना महामारीने सर्वांना ग्रासले आहे. परंतु, अशा परिस्थितीत अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावत आहेत, ही स्तुत्य बाब आहे. रयत संघटना अडचणीच्या काळात नेहमीच लोकांच्या पाठिशी उभा राहिली आहे. लॉकडाऊन काळात अनेकांना त्यांनी जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे. यावेळी उदयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.