सातारा: उंबर्डेत बैलगाडी अड्ड्यावर छापा

वडूज पोलिसांकडून कारवाई; सहा लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
वडूज (प्रतिनिधी) –
उंबर्डेच्या (ता. खटाव) हद्दीत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यत भरवणाऱ्यांवर वडूज पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईत सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडूज पोलीसांतून मिळालेली माहिती अशी उंबर्डे कॅनॉलजवळ मोकळ्या माळावर बेकायदा बिगरपरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना माहिती मिळाली. त्या अनुषंगाने धनाजी वायदंडे, दीपक देवकर, संग्राम बाबर, संदीप शेडगे, श्री सुतार, संतोष काळे, सागर बदडे व नरळे यांनी त्या ठिकाणी जाऊन या बैलगाडी अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पांढऱ्या रंगाच्या पिकअप, सात बैलगाड्या अशा एकूण सहा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी अशोक उर्फ पप्पू पवार, सूरज पवार, शंकर पवार (तिघे रा. उंबर्डे), गणेश गिरंजे (रा. नसरापूर, पुणे), संतोष बुधावले (रा. आरफळ कॉलनी, कोरेगाव), अनिकेत घाडगे (रा. ललगुण), प्रकाश जाधव (रा. भाडळे) व अन्य चार ते पाच व्यक्तींनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत बैलांना जोरात पळण्यासाठी चाबकाने मारून शेपटी दाताने चावत व सध्या कोविडच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास धनाजी वायदंडे करीत आहेत.

परफेक्‍ट मॅनेजमेंटला दणका
न्यायालयाच्या निर्णयानुसार अनेक वर्षे बैलगाडी शर्यतीस बंदी आहे. तरीही वडूज, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावात किरकोळ प्रमाणात चार दोन गाडी मालक एकत्र येऊन शर्यतीचा शौक पुरा करत होते. त्यासाठीसंबंधित विभागातील बिट अंमलदार व इतर दक्ष कारभाऱ्यांना किरकोळ चिरीमिरी देऊन समाधान केले जात असे. याकामी काही जण मॅनेजरची भूमिका निभावत होते. उंबर्डे येथेही पोलिसांना गृहीत धरून मोठ्या प्रमाणावर शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, संयोजकांना मालोजीरावाचा आवाका न आल्याने परफेक्‍ट मॅनेजमेंटला तडाखा बसल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.