फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटणच्या संचालक लि.,मंडळाची मुदत संपल्याने होणारी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे नीलिमा गायकवाड यांनी फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी फलटण यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका आंबेकर नियुक्ती केली आहे.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दि. ६ मार्च रोजी दिलेल्या निवेदनामध्ये कारखाना निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रारूप हे सहकार कायदा व उपविधीप्रमाणे
तयार न करता निवडणूक अधिकारी यांना सादर केली. त्यावर हरकती घेण्यात आल्या. परंतु, मतदार याद्या दुरुस्त न करता सदोष मतदार याद्या सादर केल्यामुळे सदर निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होणार नसल्याचे नमूद करत प्रशासक नियुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी नमूद केले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणच्या संचालक मंडळाची मुदत दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपली असून संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक मतदार यादीबाबत निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे या आदेशात निदर्शनास आणून दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयात विश्वासराव भोसले यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन याचिकेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कारखाना निवडणूक शासनाने पुढे ढकलली आहे.
त्यामुळे अनिश्चित कालावधीकरिता नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येऊ शकत नसल्याने, उद्भवलेल्या परिस्थितीत संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (१) (ब) परिस्थिती निर्माण झाल्याने प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक झाले असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ (अ) (१) (ब) मधील तरतुदीनुसार प्रस्तुत आदेश तातडीने जारी करणे आवश्यक असल्याने आदेश जारी करण्यापूर्वी त्याची नोटीस जाहीर करायची आवश्यकता नसल्याची आपली खात्री झाल्याने हा आदेश पारित केल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे यांनी आदेशात नमूद केले आहे.