खा. उदयनराजे भोसले; शाहूपुरीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
सातारा – नगरपरिषदेच्या माध्यमातून सातारच्या जनतेच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. करोना काळात खर्चावर मर्यादा असतानाही, हद्दवाढीत आलेल्या भागाच्या मूलभूत विकासासाठी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रामणिकपणे प्रयत्न करत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवणे किंवा नगरपरिषदेच्या स्वनिधीतून विकास साधण्याचे प्रयत्न आहेत. हद्दवाढीच्या भागाच्या विकासात कमी पडणार नाही, अशी ग्वाही खा. उदयनराजे भोसले यांनी दिली.
नगरपालिका हद्दीत आलेल्या शाहूपुरीतील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, माजी सरपंच सिद्धार्थ निकाळजे, नगरपरिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, अधिकारी, अमित कुलकर्णी, सौ. मुग्धा पुरोहित, गणेश आरडे, अनिरुद्ध दाभाडे, रमेश धुमाळ, राजेंद्र गिरीगोसावी, अमृता प्रभाळे, जवानमल जैन, सतीश कदम, अजित ग्रामोपाध्ये, भैरव चव्हाण, सुरेश साधले, प्रवीण औसेकर, सौ. मनीषा फरांदे, रवी शिवणकर, प्रवीण शिंदे, अभिजीत गाडे, किरण वाघमोडे, नासीर सय्यद, उमेश साळुंखे, आबा इंगवले, सिकंदर पाटोळे, दीपक घाडगे उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, सातारा ही अ’ वर्ग नगरपरिषद आहे. शहर हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नागरिक पूर्वीपासूनच मनाने साताऱ्याशी एकरूप झाले आहेत. या भागातील कचरा सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जात होता. आता रितसर हद्दवाढ झाल्याने, या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण, बंदिस्त गटारे आदी सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे.
दरम्यान, श्रीराम कॉलनी ते गुरुप्रसाद कॉलनी, शाहूपुरी पोलीस ठाणे, पवार कॉलनी ते मुख्य रस्ता, गुलमोहर कॉलनी, आयटीआय रोड ते वैष्णोदेवी मंदिर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व पार्किंग शेडचे लोकार्पण, श्रीराम कॉलनी व पवार कॉलनीत बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन, चिंतामणी सोसायटीतील बंदिस्त गटरे, जयविजय कॉलनी-देशपांडे मारुती मंदिर-आगवेकर घर रस्ता डांबरीकरण व बंदिस्त गटारे, आझादनगर, चिंतामणी सोसायटी-भंडारी घर गटारे, देशपांडे घर ते कुलकर्णी घर (आझादनगर) बंदिस्त गटारे, पेंडसेनगर आयटीआय रोड-भापकर घर रस्ता डांबरीकरण, बंदिस्त गटारे, सावंत घर ते मोळाचा ओढा चौक बंदिस्त गटारे, सर्वोदय कॉलनीत काकडे वस्तीतील काकडे घर ते नामदेव शिंदे घर रस्ता डांबरीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले.