सातारा: रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाला पसंती

सेंद्रीय हळदीचा तुटवडा; साताऱ्यात गुळवेल, तुळस, च्यवनप्राशला वाढती मागणी
सातारा (प्रतिनिधी) –
करोनाच्या प्रतिबंधासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांना पसंती दिली जात आहे. सातारकरांनी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हळद, गुळवेल आणि च्यवनप्राश व आयुर्वेदिक काढे यांच्या सेवनाला प्राधान्य दिले आहे.

जिल्हयात बाधितांचा आकडा 25 हजाराकडे पोहचला असून मृतांची संख्या 690 झाली आहे. मृतांमध्ये करोनाशिवाय इतर आजारांमुळे संसर्ग वाढून मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सरासरी प्रमाण 28 टक्के आहे. सतर्क सातारकरांनी संसर्ग टाळण्यासाठी सेंद्रिय हळद व गुळवेल, च्यवनप्राश तसेच प्रतिकार काढे यांचा वापर वाढवला आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गिलोय अर्थात गूळवेलीचा काढ्याच्या उपयुक्ततेबाबतचे ऑनलाइन सर्च रिपोर्ट पाहून त्याची खरेदी वाढली आहे. जो गूळवेल अतिपरिचयाचा नव्हता, त्या गुळवेल काढ्याच्या सरासरी पाच ते दहा बाटल्यांची मागणी दिवसाला होत आहे.

गूळवेल काढा नैसर्गिकरित्या अंर्तगत शरीराची स्वच्छता करून उर्जा प्रदान करणारा असल्याने त्याची मागणी वाढल्याचे आयुर्वेदिक स्टोअर भांडारचे चंदन शिवनामे यांनी सांगितले. तसेच गरम दुधातून घेण्यासाठी सेंद्रिय हळदीला मागणी वाढली आहे. सेंद्रिय हळदीचे जिल्हयात 22 हजार क्विंटल उत्पादन झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. वाई, उडतारे,सुरूर, कवठे या भागात हळदीचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाचा हळदी उत्पादनावर परिणाम झाला आहे. सांगलीच्या ऑनलाइन सौदेबाजाराला यंदा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सांगलीवरून साताऱ्यात येणारी हळद अवघी दहा हजार क्विंटलच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हळदीला मागणी प्रचंड आहे. मात्र, उत्पादक शेतकऱ्याला भाव नसल्याने जानेवारीत सुरू होणारा पुढील हंगाम अडचणीत घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सेंदिय हळदीचा तुटवडा जाणवत असून मसाल्याच्या हरिद्रा म्हणजे घरगुती हळदीवर सातारकरांना समाधान मानावे लागत आहे. याशिवाय च्यवनप्राश व ड्रायफ्रुटला अचानक मागणी वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. साताऱ्याची अर्कशाळा प्रसिद्ध असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सातारकर च्यवनप्राशला पसंती देत आहे. बदाम, काळे मनुके व सुके अंजीर बाजारात अडीचशे ते तीनशे रूपये पावशेर या किंमतीत उपलब्ध असून त्यांचे सेवन आवर्जून केले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.