सातारा : शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वृध्दीसाठी तसेच विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) २६५ केंद्रांवर ९ हजार ६३३ विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि उत्तम दर्जाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणे, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याची संधी उपलब्ध करून देणे, होतकरू गरजू प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांची संधी देणे, भविष्यातील स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध करून देणे, प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे, जिल्हा परिषदेचे शिक्षण विषयक कार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचविणे या हेतूने सातारा जिल्हा परिषदेने बुधवारी (दि.२६) प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यामध्ये इयत्ता चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची १५४ केंद्र निश्चित केलेली असून त्या केंद्रांवर २२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इयत्ता सातवीची परीक्षा १११ केंद्रांवर होणार असून ७ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये पेपर क्रमांक एक घेण्यात येणार असून तो सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होईल. दुसऱ्या सत्रामध्ये पेपर क्रमांक दोन होणार असून त्याची वेळ दुपारी २ ते ३.३० असणार आहे.
या परीक्षेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीयाशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या समन्वयातून करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज झाला असून परीक्षेच्या आयोजनाची पूर्ण तयारी झालेली आहे.