कोल्हापूर परिक्षेत्रात सातारा पोलिस ठरले “चॅम्पियन’

सातारा – कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिसांनी “तेजस्वी’ कामगिरी करून दाखवत सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलीस दलांच्या खेळाडूंवर मात करून सातारा पोलिसांनी चॅम्पियनशिप मिळवली. हा बहुमान सातारा पोलिसांना तब्बल चार वर्षांनी मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलीस दलात काम करत असताना सतत तणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यात संघ भावना निर्माण व्हावी, यासाठी देशभरात पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. कोल्हापूर परिक्षेत्रीय 47 वी पोलीस क्रीडा स्पर्धा नुकतीच सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारात पार पडली. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. दि. 1 डिसेंबरला सुरू झालेली ही स्पर्धा दि. 5 रोजी संपली. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील एकूण 180 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सातारा पोलीस दलाला ऍथलेटिक्‍स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी, हॅन्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, कुस्ती, वेटलिफ्टींग, बॉक्‍सिंग, जलतरण, महिला वेटलिफ्टींग या खेळ प्रकारात खेळाडूंनी चॅम्पियनशिप पटकावली. तर ऍथलेटीक्‍स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, कुस्ती, वेटलिफ्टींग, बाक्‍सिंग, ज्युदो, क्रॉसकंट्री या खेळप्रकारात महिला खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 26 गोल्ड, 30 सिल्वर, 20 ब्रॉंन्झ अशी एकूण 76 पदकांची कमाई केली. या यशाबद्दल पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, राखीव पोलीस निरीक्षक अंकुश यादव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.