सातारा – फलटण येथील महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे याच्या टोळीवर पोलिसांनी “मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीत माक्यासह विकास जाधव, हिमालय धायगुडे यांचा समावेश असून दीड महिन्यापूर्वी या तिघांनी एका दाम्पत्याला धमकावून दोन लाख 51 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याबाबत वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या टोळीवर तब्बल 24 गुन्हे दाखल असल्याने, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
सोळशी, ता. कोरेगाव परिसरात जंगलाजवळ असलेल्या डोंगरातील पवनचक्क्यांकडे जाण्यासाठी तयार केलेल्या रस्त्याने एक दाम्पत्य दि. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केदारेश्वर मंदिराकडे निघाले होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून पतीला मारहाण करत, या दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा अडीच लाखांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना,
महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक, फलटण), विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई) व हिमालय सतीश धायगुडे (रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीस गेलेला ऐवज, संशयितांनी वापरलेली वाहने व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली वाहने, असा एकूण चार लाख आठ हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास वाठार स्टेशनचे सपोनि स्वप्निल घोंगडे करत होते. या तिघांनी संघटितपणे फलटण तालुका, वाई, पुसेगाव, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा व पुणे जिल्ह्यातील बारामती हद्दीत महामार्गावर आणि इतर जोड रस्त्यांवर अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. या मार्गावरील प्रवासी, दुकाचीस्वार, महिला, जोडपी यांच्या वाहनांचा पाठलाग करून, हे तिघे जण दगड, चाकू, सत्तूर, लाकडी दांडके यांच्या धाकाने दागिने, मोबाइल, रोकड चोरत होते. त्यांच्यावर मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दरोडा, जबरी चोरी, चोरी, असे अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी “मोक्का’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता.
त्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सातारा ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे करत आहेत. “मोक्का’ प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि स्वप्निल घोगडे, एलसीबीचे हवालदार प्रवीण शिंदे, सचिन जगताप, वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे तानाजी चव्हाण यांनी प्रयत्न केले.
मोक्का कारवाईचा सपाटा
बन्सल व धीरज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये प्रभावी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर जिल्ह्यात अक्षय लालासाहेब पवार (रा. रविवार पेठ, सातारा), निखिल प्रकाश वाघमळे (रा. अंबवडे, ता. कोरेगाव), अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईज, ता. वाई) या टोळीवर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.