सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी, डागडुजी करून करोना केअर सेंटर सुरू करावे
अजय माळवे
फलटण (प्रतिनिधी)- येथील गिरवी रोडवरील झिरपवाडी येथे बंद असणारी ग्रामीण रुग्णालयाची इमारत, कर्मचारी निवासस्थाने तसेच इतर इमारती दुरुस्ती करोना केअर सेंटरसाठी करुन वापरात आणाव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. अन्यथा या इमारतीची जागा जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे 25 वर्षापूर्वी बांधकाम झाले. त्या काळात अनेक वर्षे ग्रामीण रूग्णालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते. 1997 मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर फलटणलो आले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन दिले. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाने दि. 28 नोव्हेंबर 1997 रोजी हे ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. परंतु, काही काळ सुरू ठेवल्यानंतर ते बंद करण्यात आले. या रुग्णालयाच्या इमारतीवर शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. अधिकारी तसेच कर्मचारी निवासस्थानावरही मोठा खर्च केला आहे.
आज या रुग्णालयाच्या इमारतीची पूर्ण दुरवस्था झाली असून दारे, खिडक्या तसेच तेथील वस्तू चोरीस गेल्या आहेत. इमारत वापरात आणण्यापूर्वी खर्च करावा लागणार आहे. करोना वाढत चालला असताना शासन खासगी रूग्णालये ताब्यात घेत आहेत. अशा वेळी या इमारतीचा मोठा उपयोग होणार असून ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. माजी आमदार चिमणराव कदम यांनी ग्राणीण रूग्णालयाची संकल्पना मांडली. पण जागेचा प्रश्न होता.एका शेतकऱ्याने आठ एकर जागा ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीसाठी दिली आहे. हे रुग्णालय सुरु न झाल्यामुळे या शेतकऱ्याने आता आपली जागा परत मागितली आहे. आज करोना काळात दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत. फलटणसारख्या ठिकाणी मोठ्या रुग्णालयाची गरज असून मोठा निधी उभारून हे ग्रामीण रुग्णालय सुरु करावे अन्यथा या रुग्णालयाची जमीनही जाऊ शकते, याचा विचार होणे गरजेचे आहे.