प्रांताधिकारी संगीता चौगुले
महाबळेश्वर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर “अनलॉक 4′ नुसार राज्य शासानाने लागू केलेले नियम व अटींचे पालन करून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिली.
“अनलॉक 4′ लागू करण्यात आला असला तरी महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी येथील हिरडा विश्रामगृहात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल व्यवसायिकांची बैठक झाली. बैठकीस तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कदम, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, पाचगणीचे सपोनि सतीश पवार उपस्थित होते. पर्यटकांचे ऑनलाइन आरक्षण करावे. पर्यटकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे. त्यांची माहिती प्रशासनास ऑनलाइन कळवावी.
हॉटेलमधील सर्व नोकरांच्या करोना चाचण्या बंधनकारक आहेत. पर्यटकांना खोल्या देण्यापूर्वी आणि पर्यटक गेल्यानंतर खोल्यांमध्ये जंतुनाशकांची फवारणी आणि हॉटेल व परिसरात दोन वेळा फवारणी करणे आवश्यक आहे. पर्यटकांची थर्मामीटर व पल्सऑक्सीमीटरने तपासणी केल्यानंतरच त्यांना आत प्रवेश द्यावा. पर्यटक व हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्क व हातमोजे यांचा वापर करणे आवश्यक आहे. वापरलेले हातमोजे व मास्क हा वैद्यकीय कचरा असून त्याची विल्हेवाट त्याच पद्धतीने लावली गेली पाहिजे. त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असा कचरा गोळा करून त्याची एकत्र विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने करावा.
करोनाची लक्षणे दिसत असलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनास देणे आवश्यक आहे. अशा पर्यटकांना करोना केअर सेंटरमध्ये दाखल करणे किंवा हॉटैलमध्ये स्वतंत्र सोय केली पाहिजे. हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉल बंद राहतील; परंतु त्याचा वापर केवळ पंधरा लोक करणार असतील, तर हॉल सुरू करता येईल. स्विमिंग पूल व बार बंदच राहतील. पर्यटक येथे येण्यापूर्वी त्यांच्या पंधरा दिवसांच्या प्रवासाची माहिती घेतली गेली पाहिजे. हॉटेलमधील सर्वांनी शारीरिक अंतर राखले पाहिजे, अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. हॉटेल व्यावसायिकांच्या शंकांचे निरसन संगीता चौगुले व सुषमा चौधरी यांनी केले.