सातारा – शैक्षणिक फीच्या तगाद्याने विद्यार्थ्यांसह पालक हैराण

संतोष पवार करोनाच्या संकटात वेठीस धरण्याचा प्रकार; अनेक शाळांकडून ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक

सातारा – करोनाच्या संकटाने अर्थव्यवस्था अडचणीत आली. अनेकांचे रोजगार गेले, उद्योग, व्यवसाय अडचणीत आले. अशा संकटाच्या परिस्थितीतही खासगी शिक्षण संस्थांकडून पालक, विद्यार्थी यांच्याकडे शालेय फीसाठी तगादा सुरु आहे. सततचे फोन, ऑनलाइन क्‍लासच्या ग्रुपवर पालक, विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक दिल्याच्याही तक्रारी येत आहेत. आपल्या पाल्यांना त्रास होईल म्हणून तक्रार करण्यास कुणी धजावत नसले तरी याबाबत शिक्षण विभागाने माहिती घेऊन पालक, विद्यार्थ्यांना आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.

शाळांच्या फी वसुलीचे प्रमाण दरवर्षी चांगले असते. यावर्षी मात्र करोनाच्या जागतिक संकटाने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी सरकार आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. शाळा बंद असल्याने संस्थांच्या खर्चात बचत होणार आहे. परिणामी शैक्षणिक संस्थांनी शालेय फी वाढवू नये, पूर्वीच्या फीमध्ये कपात करावी, आकारण्यात येणारी फी टप्प्याटप्याने घ्यावी, असे आदेश दिले. मात्र, शिक्षण संस्थांनी न्यायालयात धाव घेत शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली. वास्तविक शासनाचा निर्णय पालक, विद्यार्थी हिताचा होता. यामध्ये शिक्षण संस्थांनीही सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही पालक आणि विद्यार्थ्यांना फी साठी वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यातील खासगी शाळांकडून फीसाठी तगादा लावण्यात येत आहे.

रात्री- अपरात्री, दिवसा पालकांच्या मोबाइलवर फीच्या मागणीचे फोन येत आहेत. काही शाळांबाबत तक्रारी झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सर्व शाळांशी पत्रव्यवहार करुन फीसाठी तगादा न लावण्याच्या सूचना केल्या. मात्र, अद्यापही असे प्रकार होत आहेत. पाल्यांना त्रास होईल म्हणून अनेक शाळांबाबत तक्रारी पुढे येत नाहीत. काही पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. पालकांना फीमध्ये सवलत न देणे, पालकांना विश्‍वासात न घेणे असे प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

संकटाच्या काळात शिक्षणसंस्थांनीही सामंजस्याची भूमिका घेत फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतल्यास अडचणी दूर होतील, अशा प्रतिक्रिया पालकवर्गातून व्यक्त होत आहेत. फी भरली नाही म्हणून पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्‍लासच्या ग्रुपवर वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. नववी ते बारावीच्या 93 टक्के शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते आठवीच्या ऑनलाइन क्‍लासची उपस्थिती कमी होत आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन क्‍लासला ब्रेक दिला आहे. याबाबत पालकांमधून नाराजीचा सुर आहे. शिक्षण विभागाने संबंधित शिक्षण संस्थांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

सामंजस्याची भूमिका गरजेची
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरु होण्याचे प्रमाण अत्यंत चांगले आहे. करोनाच्या संकटात एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. शिक्षण संस्था आणि पालक यांच्यात दरी न वाढता दोन्ही बाजूकडून सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यातील सर्व शाळांशी पत्रव्यवहार केला असून शालेय फीसाठी तगादा न लावण्याच्या सूचना केल्या आहेत. ऑनलाइन क्‍लास घेण्याबाबतही सांगण्यात आले आहे. याबाबत पालकांची तक्रार आल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल.
– राजेश क्षीरसागर
(माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा) 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.