सातारा : ‘त्या’ वृद्धेचा खून अनैतिक संबंधातूनच – पोलीस अधीक्षक बन्सल

सातारा – साताऱ्याजवळी कृष्णानगर येथील जया गणेश पाटील ( रा. गजानन हौसिंग सोसायटी) या वृद्धेचा खून अनैतिक संबंधांमधून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अनंत दाजीबा पेडणेकर (वय 33, रा. संभाजीनगर, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे उपस्थित होते.बन्सल म्हणाले, जया पाटील यांचा 16 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता खून झाला होता. त्यांचा मोबाइल गायब करण्यात आला होता.

सातारा शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर विभाग यांच्या पाच पथकांनी या गुन्ह्याचा संयुक्तरित्या तपास केला. तांत्रिक विश्‍लेषण आणि काही धागेदोरे जुळवत साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंत पेडणेकर अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

पेडणेकर याची प्रवासादरम्यान जया पाटील यांच्याशी ओळख झाली होती. तो दोन-तीन वेळा त्यांच्या घरी गेला होता. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधांमध्ये झाले. खुनाच्या दिवशी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी पेडणेकर याने जया पाटील यांच्याच घरातील धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला होता.

हा चाकू पोलिसांनी जप्त केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मचले तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी ही कारवाईत केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.