कराड – ओगलेवाडी येथील घरफोडी प्रकरणात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 24 तासात एकास ताब्यात घेत त्याच्याकडून 88 तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रक्कम हस्तगत केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणातील आणखी काही संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची पथके रवाना झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ओगलेवाडी (ता. कराड) येथील उद्योजक कै. वसंत दिनकर खाडे यांचे बंद घर फोडून घरातील 110 तोळे दागिन्यांसह दीड लाख रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
ओगलेवाडी येथे घडलेल्या या घटनेनंतर सोमवारी घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या टीमने बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार गतीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासात संशयितास खटाव तालुक्यातील तडवळे येथून रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 110 तोळे दागिन्यांपैकी 88 तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके विविध जिल्ह्यात रवाना झाली आहेत.