Satara News – चित्रकलेचे प्रदर्शन, युथ फेस्टिव्हलमध्ये रंगलेली रस्सीखेच, फॅशन शो, पॅराग्लायडिंग आणि संगीताची मेजवानी यामुळे ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलने आज रविवारी पर्यटकांसह स्थानिकांना मनमुराद आनंद दिला. ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलसाठी दै. प्रभात माध्यम प्रायोजक आहे. फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कला दालनातून झाली.
अनेक मान्यवर चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. जे. जे. आर्ट्स कॉलेजचे काही स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. या स्टॉलवर या चित्रांच्या फ्रेमची विक्रीही करण्यात आली. या स्टॉलला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेली दोन दिवस पॅराग्लायडिंगचा थरार पाहावयास मिळत होता.
या पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. फेस्टिवलमध्ये पॅराग्लायडिंगवर विशिष्ट सवलत देऊन पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अवकाशातून पक्ष्याप्रमाणे उडता येण्याचा एक अनुभव पॅराग्लायडिंगमधून पर्यटकांनी घेतला. या पॅराग्लायडिंगमधून वणवा लावू नका, निसर्गाला धोका पोहोचू देऊ नका, वन्यजीवांचे हाल करू नका, अशा प्रकारचे संदेश अवकाशात उडणाऱ्या पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून देण्यात आले. हे संदेश पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते.
युथ इव्हेंटमध्ये अनेक खेळ खेळण्यात आले. यामध्ये रस्सीखेच हा खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या खेळामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पुरुष, महिला या सर्वांनी यामध्ये भाग घेतला. या खेळामध्ये एकूण सात खेळाडूंचा भाग राला. अशा दोन टीम करण्यात आल्या. त्या टीममध्ये चांगलाच सामना पाहावयास मिळत होता. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी झेविअर्स हायस्कूल, तोफास गेम, विद्यानिकेतन हायस्कूल, सिध्दीविनायक, नेक्सस ए, नेक्सस बी अशा टीमने भाग घेतला होता. यांच्यामध्ये हे रस्सीखेचचे सामने खेळण्यात आले.
त्याचबरोबर महिला पोलीसांसह महिलांच्याही संघांनी रस्सीखेचीमध्ये भाग घेतला. या खेळामध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना कोणतेही शुल्क आकारणी न करता या खेळामध्ये भाग घेण्यासाठी सवलत देण्यात आली होती. पर्यटकांनीही या संधीचा चांगलाच फायदा घेतला. सायंकाळच्या मैफलीमध्ये रवी यांचा म्युझिक बँड व संगीतातील मेजवानी आयोजित करण्यात आली होती या मेजवानीमध्ये रोमँटिक गाण्यांपासून विविध प्रकारची गाणी सादर करण्यात आली. अनेक जुन्या गाण्यांपासून ते आजचे नवीन गाण्यांचा झिंगाटपर्यंत अनेक गाण्यांचा आनंद रसिकांनी घेतला. काही गाण्यांवर पर्यटक मंत्रमुग्ध होऊन उत्साहात बेभान होऊन नाचताना दिसत होते.
पाचगणी व पाचगणीबाहेरून आलेल्या महिला व युवक वर्गांने फॅशन शोमध्ये भाग घेतला. या फॅशन शोमध्ये अनेक पारंपरिक वेशभूषा ते पाश्चिमात्य वेशभूषा या सर्वांचा एक सुरेल संगम पाहायला मिळाला. या फॅशन शोमध्ये पुणे, मुंबई या ठिकाणांवरूनही मॉडेलिंग करणाऱ्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता व फॅशन पण एक चांगलं करिअर होऊ शकते असे सादरीकरण करताना सहभागींनी सांगितले. फेस्टिव्हलचा शेवटचा भाग म्हणजे लकी ड्रॉचे वितरण. या लकी ड्रॉमध्ये फोर व्हीलर, टू व्हीलर, सायकल, फ्रिज, टीव्ही व अन्य घरगुती उपयोगाच्या वस्तूंचा या लकी ड्रॉमध्ये सहभाग होता.
पोलीस व पालिकेच्या चांगल्या सुविधा…
फेस्टिव्हलला चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून पोलीस प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली होती. विशेषतः वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडेही पोलिसांनी चांगलेच लक्ष दिले. फेस्टिव्हलसाठी आलेल्या पर्यटकांकडून होणारा खाद्यपदार्थाच्या वेष्टनांचा व इतर कागदी वस्तूंचा कचरा सफाईसाठी पालिकेने विशेष दक्षता घेतली होती. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून रोज कचरा उचलला जात होता. त्यामुळे स्वच्छता राहिली होती.