Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या निर्बंधांनी गुदमरलेल्या कोयना परिसरातील (Satara News) धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी आता निर्णायक लढाईचा बिगुल वाजवत सोमवारपासून (दि. २५) वन विभाग कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा एल्गार केला आहे. विकासाच्या नावाखाली गावांचा गळा घोटला जातोय, असा आरोप करत कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेने प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण या मूलभूत सुविधांची दुरवस्था झाल्याने स्थानिकांचे जीवन अक्षरशः वेठीस धरले गेले आहे. बफर झोनच्या अधिसूचनेतील त्रुटी दुरुस्त करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, स्थानिकांना विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेली विकासकामे (Satara News) यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. आमच्या जमिनी, आमचे आयुष्य… आणि निर्णय मात्र आमच्याशिवाय?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. Koyna Dam रोजगाराच्या मुद्द्यावरही संताप उसळला आहे. स्थानिक युवकांना संधी नाकारून बाहेरील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत असून तरुणाईत नाराजी वाढत आहे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सातत्याने होत असलेली दिरंगाई हा आणखी एक ज्वलंत मुद्दा ठरला आहे. अनेक कुटुंबे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून जिल्हा नियोजन निधीच्या वापराबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. मानव- वन्यजीव संघर्षाने परिस्थिती अधिकच गंभीर बनवली आहे. जंगली प्राण्यांकडून शेतीचे नुकसान, जनावरांवरील हल्ले आणि बाहेरील व्याघ्र प्रकल्पातून वाघ सोडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.‘आमचा जीव इतका स्वस्त आहे का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अभयारण्य क्षेत्रातील बंदी दिनांक अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रम कायम आहे. या सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर चैतन्य दळवी, सचिन कदम, महेश शेलार, विनायक शेलार, रामचंद्र कदम, सीताराम पवार, दिनेश देसाई, परशुराम शिर्के, राजाराम जाधव, अनिल देवरूखकर, सलीम शिकारी, शिवाजी कांबळे यांच्यासह अनेक अभयारण्यग्रस्तांच्या सह्या असून, त्यांनी आता आरपारची लढाई (Satara News) सुरू केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.