पाचगणी – ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाची उत्साही सुरुवात पॅराग्लायडिंगने करण्यात आली. पर्यटकांनी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटला. गगनामध्ये उंच भरारी घेण्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर चित्रकला प्रदर्शन, युथ फेस्टिव्हलमधील फॅशन शो, म्युझिक व बँड शो आणि मल्लखांबचा थरारही लोकांनी अनुभवला.
पाचगणीच्या रिवाईन हॉटेलनजिक सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पॅराग्लायडिंग पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. संजीवन मैदानावर दुपारी दोनच्या दरम्यान चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले होते. या चित्रकला प्रदर्शनामध्ये अनेक नामवंत चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रांमध्ये निसर्गचित्र, वास्तुचित्र, तैलचित्र, मनुष्याची हावभाव उमटवणारी अनेक चित्रे पाहयला मिळाली. हे चित्र पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी चारच्या दरम्यान मल्लखांब खेळाचा थरार पाहण्यास मिळाला. मल्लखांबासाठी पाचगणी व पाचगणीबाहेरील अनेक खेळाडूंनी भाग घेतला. लहान मुलांनी केलेल्या कसरती पाहून अक्षरशः अंगावर काटा येत होता. युथ फेस्टिव्हलमध्ये पाचगणीमधील, बाहेरील व परदेशातीलही लोकांनी सहभाग घेतला. युथ फेस्टिव्हलमध्ये फॅशन शोसारखे शो आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये युवा पिढीने जास्त प्रमाणात सहभाग घेत आपली कला सादर केली. म्युझिक व बँड यामध्ये लॉय बँड संकल्पना आयोजकांनी ठेवली होती. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांकडून वाद्य वाजवून घेण्यात येत होते. हे वाद्य वाजवत असताना बालगोपालांबरोबर वयोवृद्ध आजी- आजोबा यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता.
या फेस्टिव्हलमध्ये अनेक फुड स्टॉल लावले आहेत. यामध्ये शाकाहारी, मांसाहारी, आईस्क्रिम, पाणीपुरी चहा, लोणचे यांचे स्टॉल आहेत. त्यामुळे खवय्यांचे आवडणारे सर्व पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक हस्त कलाकृतीने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. पाचगणी फेस्टिव्हलचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रबाहेरूनही पर्यटक पाचगणीमध्ये येत आहेत. यामुळे पाचगणीतील हॉटेल व्यवसाय, टॅक्सी व्यवसाय, फळ विक्रेते व अन्य व्यवसायिकांना याचा लाभ होत आहे.