प्रशांत जाधव
सातारा – बांधकाम विभाग हा नेहमीच घोटाळे, भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. या विभागाच्या कामांच्या दर्जाबाबत होणाऱ्या तक्रारींना शासकीय पातळीवर फारसे महत्त्व दिले जात नाही; परंतु उपमुख्यमंत्रीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील, तर ते नक्कीच गंभीर आहे. वडूज पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात नेमके असेच घडले. या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावरून, निधीवरून भर सभेत अजितदादांनी साताऱ्याच्या बांधकाम विभागाच्या कारभारावर “बुलडोझर’ फिरवला.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आलेल्या अजितदादांची गाडी इमारतीच्या पोर्चमध्ये थांबली आणि त्यांच्या शोधक नजरेने बांधकामातील चुका काढायला सुरुवात केली. पोर्चच्या उंचीवरून व पायऱ्यांवरून त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांना पोर्चमध्येच जाब विचाचला.
त्यानंतर कोनशिला अनावरण करताना अजितदादांनी पडदा तावातावाने हटवल्याने वातावरण तापल्याचे अनेकांच्या लक्षात आले. इमारतीची आतून पाहणी करून आल्यानंतर दादांनी त्यांच्या खास स्टाइलमध्ये बांधकामाच समाचार घेतला. इमारतीचे पोर्च, पायऱ्यांमधील अंतर, बांधकामाचा दर्जा, सहा हजार चौरस फुटांच्या इमारतीला झालेला तीन कोटींचा खर्च या सगळ्यांचा हिशोब मांडताना, दादांनी बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगली.
तेवढ्यावर न थांबता त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना, याची नोंद घेऊन, जनतेचा पैसा खर्च करताना तारतम्य बाळगण्याची सूचना केली. इमारतीच्या प्रांगणात कुठे खड्डे तर कुठे टेंगळ असल्याने दादांनी ठेकेदार, बांधकाम विभागाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरच बुलडोझर फिरवल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
जबाबदारी निश्चित करा
पोलीस ठाण्याच्या इमारत लोकांच्या करातून आलेल्या पैशातून बांधली आहे. अजितदादांच्या म्हणण्यानुसार काम दर्जेदार नसेल तर जनतेच्या पैशाचा अपव्येय झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून, त्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.