जिल्ह्यातील 632 गावांसाठी 8.23 कोटीचा टंचाई आराखडा

पाणी पुरवठा योजनांची 5 टक्के रक्कम भरण्यास शासनाची मान्यता

“विकास वाटा’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्याच्या विकास कामांवर आधारित विकास वाटा ही घडीपुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या घडीपुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या घडीपुस्तिकेमध्ये विविध विभागांनी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आलेली आहे.

सातारा – सातारा जिल्ह्यातील 632 गावांसाठी 8.23 कोटी इतक्‍या रकमेचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये 55 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून माण तालुक्‍यात सर्वाधिक 42 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. तसच टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. ज्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकामुळे बंद आहेत अशा योजनांची 5 टक्के रक्कम टंचाई निधीमधून भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे, याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी महत्वपूर्ण माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना सांगितली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर मिलींद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून चांगले काम झाले आहे. या अभियानांतगत सन 2015-16, 2016-17, 2017-18 व 2018-19 या चार वर्षात अखंड काम सुरु आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 व 2016-17 मध्ये हाती घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे, उपचारांमुळे 17040.24 टिसीएम पाणी साठा उपलब्ध झाला असून विहिंरींच्या पाणी पातळीत 0.50 ते 1.38 मिटरने वाढ झालेली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2018-19 मध्ये शासनाच्या निकषाच्या अधिक राहून 91 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांचे 820 कामांचा आराखडे तयार करण्यात आले आहेत व यातील 414 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यातील एकूण 26 प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम, बलकवडी, कुडाळी, मोरणा गुरेघर व वांग 5 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून 597 कोटी व राज्य शासनाकडून 1935 कोटी असे एकूण 2532 कोटी निधी प्राप्त होणार आहे. यातून 47846 हेक्‍टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. नोव्हेंबर 2018 पर्यंत केंद्र शासनाकडून 488 कोटी निधी प्राप्त झाला असून या प्रकल्पांवर 1531 कोटी खर्च झाला आहे. यातून 24073 हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

कोयना धरणामध्ये विस्थापीत झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे. त्याबाबत वेळोवेळी बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. परंतू अद्यापपर्यंत कोयना धरणग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन झालेले नसल्यामुळे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात वेगवान सोडवणूक आणि विकसनशिल पुनर्वसन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. कोयना प्रकल्पांतर्गत पाटण, जावली व महाबळेश्‍वर तालुक्‍यातील निवाड्यांची डाटा एंट्री एजन्सीमार्फत करण्यात आली आहे. संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत तपासणी करुन चावडी वाचन करण्यात आले असून लवकरच संकलन रजिस्टर अद्यावत करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सचुनेनुसार याही वर्षी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्यात लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी मी प्रयत्नशील राहील.
विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)