सातारा: वन कर्मचाऱ्यांकडूनच चाळकेवाडीत निसर्गसंपदेची होरपळ

पवन ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात जाळपट्टा काढताना प्रकार

ठोसेघर  – चाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्रात जाळपट्टा काढताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच पवन ऊर्जा प्रकल्प परिसरात वणवा लावून निसर्गसंपदेची होरपळ केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. या वणव्यात ग्रामपंचायत हद्दीतील वनसंपदेचे नुकसान झाले असून गुरांचा चाराही मोठ्या प्रमाणावर जळून नष्ट झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जैवविविधतेने व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चाळकेवाडी आणि जगमिन गावच्या हद्दी वन विभागाच्या हद्दीशी भिडलेल्या आहेत. चाळकेवाडी व जगमिन हा परिसर वनसंपदने समृद्ध आहे. वन विभागाच्यावतीने त्यांच्या हद्दीत जाळपट्टा काढण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू होते. यादरम्यान वन कर्मचाऱ्यांनी गावच्या हद्दीतील मेढा फाटा ते नवा दारा दरम्यान 25 मीटर रुंद आणि 500 मीटर लांब परिसरात वणवा लावला. यात मोठ्या प्रमाणावर गुरांचा चारा जळून नष्ट झाला.

त्याचबरोबर अनेक दुर्मिळ कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, वनस्पतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन विभागाच्या हद्दीतील वनसंपदेच्या संरक्षणार्थ जाळपट्टे काढताना निसर्गसंपदेची वन कर्मचाऱ्यांनीच केलेली होरपळ निंदनीय आहे. गुरांचा चाराही नष्ट झाल्याने वन विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.