सातारा: जिल्ह्यात आजपासून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

संजय भागवत; मृत्यूदर कमी करण्यासाठी 912 पथकांमार्फत सर्व्हे, करोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाचा निर्णय
सातारा (प्रतिनिधी) –
राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात मंगळवारपासून (दि. 15) 912 पथकांमार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली.

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात करोनाचा कहर वाढत आहे. बाधितांबरोबरच मृत्यूचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सहा लाख 83 हजार 341 कुटुंब संख्या गृहित धरुन 912 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये एक आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचवलेले दोन स्वयंसेवक (एक पुरुष, एक स्त्री) यांचा समावेश असणार आहे. या पथकांमार्फत गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे.

व्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) आजारी व्यक्तींना उपचार व आरोग्य शिक्षण देण्याचे काम या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. एक पथक दिवसात 50 कुटुंबांना गृहभेटी देणार आहे. 15 दिवसांत कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांना गृहभेटी देण्याची फेरी दि. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर व दुसरी फेरी 14 ऑक्‍टोबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार असून जिल्ह्यावासियांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संजय भागवत यांनी केले आहे.

करोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम मृत्यूदर कमी आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती यांना आवाहन करण्यात आले आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी समाजातील विविध घटकांनी योगदान देण्याची गरज आहे.
– संजय भागवत, (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.