सातारा: करोनाच्या संकटात मोबाइल नेटवर्कची अडचण

संपर्काअभावी एखाद्या बाधिताचा बळी गेल्यास कंपन्या जबाबदार : माने

सणबूर (वार्ताहर) – तळमावले परिसरात बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना सुविधा पुरविल्या जात नसून केवळ नवीन जाहिराती करून ग्राहकांना लुटण्याचा धंदा सुरू आहे. नेहमीच नॉटरिचेबल राहणाऱ्या या कंपन्यांचा कारभार रामभरोसे बनला आहे. नेटवर्कसाठी कुणी झाडावर तर कुणी घरांच्या छताचा आधार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला आता नेटवर्कची अडचण निर्माण होत असल्याने केवळ संपर्काअभावी एखाद्या रुग्णाचा बळी गेल्यास त्याला संबंधित कंपन्यानाच जबाबदार धरले जावे, अशी मागणी सरपंच रवींद्र माने यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन संबंधित कंपन्यांसह गृहमंत्री शंभूराज देसाई, यांना देण्यात येणार आहे. पाटण हा दुर्गम आणि अनेक वाडीवस्त्यांचा तालुका. या तालुक्‍यातील जनतेच्या डोक्‍यावर नेहमीच नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असते. सध्या करोनामुळे तालुक्‍यात हजारो चाकरमानी गावाकडे परतले आहेत. यापैकी अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा आधार घेत घरातूनच ऑनलाईन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर विद्यार्थ्यांनाही आता शैक्षणिक अभ्यासासाठी ऑनलाईनच हजर रहावे लागत आहे. मात्र, ढेबेवाडी विभागातील अनेक गावात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये अजूनही बीएसएनएल अथवा अन्य खासगी कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मोबाईलच्या विविध खासगी कंपन्यांनी कायदेशीर बाबी पायदळी तुडवत नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठांच्या ठिकाणीही इमारतींवर भले मोठे टॉवर उभारले आहेत. तर बीएसएनएलने तळमावले, ढेबेवाडी, सणबूर, कुंभारगांव, काळगांव आदी ठिकाणी टॉवर उभारुन लाखो ग्राहक जोडले आहेत. सध्या करोनामुळे प्रत्येकजण भितीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन एक-एक क्षण पुढे ढकलत असताना एकमेकांच्या संपर्कासाठी असणारा मोबाईलचा आधार निराधार बनत चालला आहे.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या चाकरमान्यांना आता आपला लॅपटॉप घेऊन कुठे झाडांच्या फांदीवर तर कुठे घरांच्या छपरांचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ना शाळा चालू ना नेटवर्क मिळते. यामुळे मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासही रामभरोसे बनला आहे. तर सध्या करोनामुळे वैद्यकीय सेवेचेही तीन तेरा वाजल्याने एखाद्या गावात साथीच्या रोगाचा अथवा करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण, गरोदर महिला प्रसूतीसाठी ऍम्ब्युलन्सची गरज पडल्यास मोबाईल असूनही नेटवर्क मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. या यंत्रणेच्या चुकीच्या धोरणांमुळे आरोग्य सुविधा मिळण्यात अडचण निर्माण होऊन एखाद्या रुग्णाचा बळी गेल्यास संबंधित कंपन्यांनाच जबाबदार धरावे, असेही सरपंच माने यांनी निवेदनात म्हंटले आहे. या कंपन्यांविरोधात ना. शंभूराज देसाई आणि पाटणचे तहसीलदार समीर जाधव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लाखो मोबाइल ग्राहकांची होतेय फसवणूक
* करारानुसार दिल्या जात नाहीत सुविधा
* टॉवरच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे ग्राहकसंख्या
* नेटवर्कसाठी घ्यावा लागतो घरांच्या छताचा आधार
* विद्यार्थी लटकतात झाडांच्या फांदीला
* ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि बॅंकानाही फटका
* प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.