कुडाळ -जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या कास पठार कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी कुसुंबी गावचे मारुती चिकणे यांची निवड करण्यात आली.
कास पठाराच्या हंगामाचे नियोजन व समितीच्या निवडीसाठी वन विभाग व कार्यकारी समितीची नुकतीच सभा झाली. यामध्ये या निवडी करण्यात आल्या. कास पठार कार्यकारी समितीमध्ये आटाळी, एकीव, कासाणी, कास, कुसुंबी व पाटेघर या सहा गावांचा समावेश आहे. आतापर्यंत आटाळी, एकीव व पाटेघर या गावांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. काल उर्वरीत कुसुंबी, कास व कासाणी या गावांच्या चिट्या टाकण्यात आल्या.
यामध्ये कुसुंबी गावची चिट्टी निघाल्याने अध्यक्षपद चिकणे यांच्याकडे गेले. तर उपाध्यक्षपदी कास गावच्या दत्ता किर्दत यांची निवड करण्यात आली. कुसुंबीमधील कार्यकारी समितीवर तीन सदस्य असून या तीन सदस्यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याने या तिघांमधून चिठ्ठीद्वारे मारूती चिकणे यांची निवड झाली. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
करोनामुळे कासचे पर्यटन गेल्यावर्षी बंद होते. सर्वांना बरोबर घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर कासचा हंगाम यावर्षी सुरू करून सुरळीत पार पाडू. राज्यभरातून पठारावर येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही समस्या भेडसावणार नाही याची व्यवस्थापन समिती तसेच वन विभाग दक्षता घेईल.
– मारूती चिकणे (अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती)