लोणंद : लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावरचा अविश्वास प्रस्ताव मोठ्या फरकाने फेटाळला गेल्याने त्यांचे पद अबाधित राहिले आहे. लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी आपल्या सह्यांचे पत्र देऊन अविश्वास प्रस्ताव सहा मार्च रोजी दाखल केला होता.
सोमवारी सोळा मार्च रोजी त्यावर मतदान घेण्यात आले. यावेळी अचानक बाजी किरण पवार यांच्या बाजूने पलटल्याचे दिसून आले. यावेळी किरण पवार यांच्या बाजूने १३ सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात केवळ नगरसेवक पुरुषोत्तम हिंगमिरे यांनीच एकमेव मत दिल्याने हा अविश्वास प्रस्ताव मोठ्या फरकाने फेटाळला गेला. यावेळी तीन नगरसेवकांनी दांडी मारली होती.
आजच्या या घडामोडींनी किरण पवार यांचे उपनगराध्यक्षपद जाणार का राहणार या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. मात्र पडद्यामागे अशा काय घडामोडी घडल्या की बारा जणांच्या सह्यांचे पत्र देऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तरीही किरण पवार यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. याबाबत लोणंद शहरात वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. ही आगामी नाट्यमय घडामोडींची नांदी असल्याचेही अनेकांचे मत आहे.