मेढा – भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशीच दारूमुक्त जावळी तालुक्यातील मेढा येथे दारुविक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. ध्वजारोहणासाठी जात असताना दारूबंदी चळवळीतील नेते व व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ यांनी दारूच्या बाटल्या पकडल्या आहे. त्यानंतर त्यांनी त्या बाटल्यांची पिशवी तहसील कार्यालयात नेऊन नंतर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, दारूबंदी चळवळीतील जवळ हे ध्वजारोहणासाठी चालले होते. यावेळी वन विभागाच्या समोरील पठाण यांच्या मटणाच्या दुकानात दारू विक्री सुरु असल्याचे जवळ यांच्या निदर्शनास आले. जवळ यांनी संबंधित दारू विक्रेत्यांच्या हातातील पिशवी घेऊन पाहिले असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी ती पिशवी तहसील कार्यालयात नेऊन दाखवली आणि नंतर पोलिस ठाण्यात नेऊन दिली.
जवळ म्हणाले की, येथिल रणरागिणींच्या माध्यमातून 14 वर्षांपूर्वी आदर्शवत ठरलेल्या दारूदुकानमुक्त जावळी तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांनी हैदोस घातला आहे. यांना रोखण्यात उत्पादन शुल्क विभागही अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. उत्पादन शुल्क विभागाची गाडी फक्त महिन्यातून एकदाच फिरते आणि कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचेही जवळ यांनी म्हंटले आहे.