लाेकसहभागातून उपक्रम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सातारा – लिंबाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून सेंद्रिय परसबाग साकारण्यात आली आहे. या परसबागेचा शालेय परसबाग स्पर्धेत सातारा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असून शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लिंबाचीवाडी शाळेने तयार केलेल्या परसबागेत लिंबू, कडीपत्ता ,शेवगा, तुळस, गवती चहा, कोरफड , अडुळसा, वांगी ,टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, कांदा, लसूण बीट, मुळा, पावटा, भेंडी, दोडका, भोपळा, काकडी, कारले, झेंडू आदी विविध प्रकारच्या देशी वाणाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. मायक्रो ग्रीन पद्धती बरोबर सिंचनाच्या सर्व पद्धतींचा वापर करण्यात आलेला आहे .सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी गांडूळ खत, जीवामृत,व दशपर्णी अर्क विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करून त्याचा वापर परसबागेत केला जातो.
मुख्याध्यापक पृथ्वीराज निकम, उपशिक्षक जयवंत जाधव यांच्या संकल्पनेतून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. माधुरी शिंदे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून परसबागेचा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
सुधाकर कणसे, सत्यवान पिसाळ , मयूर कणसे, पप्पू मिस्त्री तसेच सर्व महिला पालक यांनी परस बागेसाठी श्रमदान केले. अक्षय शिंदे व लक्ष्मी हार्डवेअरचे मालक जाधव यांनी परसबागेसाठी पाण्याची टाकी दिली. दत्तात्रय माने, विजय पिसाळ, रामचंद्र माने यांनी ट्रॅक्टरने मशागत करून दिली. सरपंच सौ. संगीता कणसे, ग्रामसेवक नवनाथ शिंदे. कृषी सहाय्यक देवराज पवार, अर्चना निकम, अंगणवाडी सेविका सौ. कल्पना पिसाळ आदींचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.
कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, गटशिक्षणाधिकारी रविंद खंदारे, शालेय पोषण आहार अधीक्षक निलम भुजबळ, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र शिंदे, सौ. जयश्री गुरव, जयश्री शिंगाडे , सुजाता पवार, केंद्रप्रमुख कृष्णात बागल यांनी शाळेचे अभिनंदन केले.