सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खासदार नितीन पाटील विधानसभा निवडणुकीत सक्रिय झाले असून जिल्ह्यात सर्वच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून दिवंगत नेते लक्ष्मणराव पाटील यांनी जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी केली होती. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा गट जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहे. हा गट सक्रिय करुन महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी खा. नितीनकाका यांनी नियोजन केले आहे. मात्र, विशेषतः फलटण, कोरेगाव, कराड उत्तर आणि वाई या चार विधानसभा मतदारसंघावर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्यांना त्यांनी कामाची दिशा दिली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या बैठका घेउन त्यांनी त्यांनाही सक्रिय केले आहे. चारही विधानसभा मतदारसंघात बुथनिहाय आढावा त्यांनी घेतला. महायुती कुठेही कमी पडणार नाही यासाठी त्यांनी जातीने लक्ष देऊन परफेक्ट नियोजन सुरु केले असून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. लक्ष्मणराव पाटील यांना मानणारा गट खा. नितीनकाकांनी नेहमीच सक्रिय ठेवला होता. हाच गट आता चारही विधानसभा मतदारसंघांत विजयासाठी प्रयत्न करेल आणि महायुतीला मोठे यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी कॉग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे.
कार्यकर्त्यांनी सर्वाधिक योगदान द्यावे : खा. पाटील
महायुतीमध्ये पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तीन प्रमुखांपैकी एक प्रमुख आहेत. शासनाच्या लाडकी बहिण योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी अजितदादांनीच निधीची तरतूद केली आहे. विरोधक शासनाच्या सर्व योजना बंद करण्याची शक्यता आहे. जनतेच्या हिताचे कामकाज व्हायचे असेल तर महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आणावी लागणार आहे. त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे योगदान सर्वाधिक असायला हवे, असे खा. नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.