सातारा: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर केंजळमध्ये सत्तांतर

अनिल जगताप; गावात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा विश्‍वास

कवठे – आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांमध्ये केंजळसह परिसरातील गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचवल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची केंजळमध्ये ताकद वाढली. गावकारभारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत केलेले नियोजन, पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवल्याने कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या केंजळ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात यश आहे, असे उद्‌गार वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप यांनी विजयी उमेदवारांबरोबर आनंदोत्सव साजरा करताना काढले.

गेले अनेक वर्षे केंजळ ग्रामपंचायतींची सत्ता किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले गटाकडे होती. गेल्या वर्षी मार्चपासून करोनोने धुमाकूळ घातला असताना, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या आणि जगण्यासाठी जीव मुठीत धरून गावाकडे आलेल्या असंख्य नागरिकांना ग्रामपंचायतींच्या कारभाराचा फटका बसला. किसन वीर कारखान्यावर गावातीलच संचालक असतानाही दुष्काळग्रस्त केंजळमधील हातातोंडाला आलेल्या उसाची वेळेत तोडणी न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

अनेक शेतकऱ्यांना वाहनचालकांना दोन वेळचे जेवण व ऊसतोडणीसाठी पैसे द्यावे लागल्याने, संबंधित संचालक व ग्रामपंचायतींच्या कारभाराविषयी असंतोष पसरला. लूाकडाऊनमध्ये गावात झालेली चोरटी दारू विक्री, त्यावर पोलिसांची कारवाई याने गावच्या संस्कृतीवर घाला घातला गेल्याची नागरिकांची भावना झाली. त्यामुळे कित्येक वर्षे सत्ता असलेल्यांना घरी बसवायचे ठरवून नागरिकांनी परिवर्तन केले, असे जगताप म्हणाले.

येत्या पंचवार्षिकमध्ये केंजळ ग्रामस्थांनी दिलेल्या विश्वासाची कास धरून आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात शासकीय योजना राबविण्यासाठी आणि प्रत्येकाच्या अडचणींमध्ये धावून जाऊ. ग्रामपंचायतीत निर्णायक भूमिका घेऊन, विरोधी पक्षाचा कोणीही कामानिमित्त आल्यास त्यालाही सन्मानाची वागणूक देऊ.

त्याचे कायद्याच्या चौकटीत बसणारे काम निश्‍चित करू. निवडणूक संपल्यावर खेळीमेळीच्या वातावरणात, ग्रामपंचायतीत लोकविश्वासास पात्र ठरेल, असे कामकाज नव्याने निवडून आलेले सदस्य करतील, अशी ग्वाहीदेखील जगताप यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.