मेढा – सातारा विधानसभा मतदार संघातून उबाठा शिवसेनेचे नेते व सातारा जावळीतील विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी यांनी भरलेला उमेदवारी अर्ज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मागे घेतल्याचे स्पष्ट करून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून यापुढेही मी शिवसेनेतच कार्यरत राहणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन पार्टे गुरुजी यांनी केले.
याबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, मी १९७७ सालापासून शिवसेना पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. वेळोवेळी पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे. मी स्वतः महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडनुकी करिता सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून माझ्या पक्षातून इच्छुक होतो. तशी तयारीही केली होती. परंतु, पक्षासह महाविकास आघाडीने अमित कदम यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.
मात्र, महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होऊ नयेम्हणून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षहित नजरेसमोर ठेऊन स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या आवाहनाशी प्रामाणिक राहात मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेताना यापुढे ही कायम माझ्या पक्षासोबतच निष्ठापूर्वक राहण्याचा निर्धार केला आहे.
अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेचे नेते विनायक राऊत अनिल परब, उपनेते तथा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सपकाळ यांनी विशेष प्रयत्न केले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागिरी येथे भेट देऊन माझी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यापुढेही शेवटच्या श्वासापर्यंत स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक राहण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.