सातारा : दानशूरांमुळे गरिबांच्या घरी मोबाइलरूपी ज्ञानगंगा

16 गरीब विद्यार्थ्यांना दिले ऍन्ड्रॉइड मोबाइल; ग्रामस्थ ठरले देवदूत
भगवंत लोहार
मल्हारपेठ –
करोनामुळे सध्या शाळा बंद आहेत.ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही अनेकांकडे ऍन्ड्रॉइड मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पाटण तालुक्‍यातील दिवशी बुद्रुक गावातील 16 गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी गावातील ग्रामस्थ देवदूत ठरले आहेत. त्यांनी या वंचित विद्यार्थ्यांना ऍन्ड्रॉइड मोबाइल देऊन त्यांच्या घरी मोबाईल रुपी ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या दातृत्वाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

दिवशी बुद्रुक हे दुर्गम आणि डोंगराळ गाव. चारी बाजूंनी डोंगराचा वेढा असणाऱ्या या गावात भौतिक सुविधा तशा कमीच. गावातील जनतेसाठी शेती हे प्रमुख साधन असलेतरी पाण्याअभावी शेती गैरसोयीचे त्यामुळे दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे गावात आहेत. पूर्वी गावातील शिक्षणाचा प्रवाह सातवीच्या पुढे थांबत होते. गावात शिक्षणाची सोय नसल्याने मुली इच्छा असूनही शिकू शकत नव्हत्या. सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात रयत शिक्षण संस्थेची भागशाळा सुरू झाली आणि उच्च शिक्षितांची संख्या वाढू लागली. हा शिक्षणाचा प्रवाह अद्याप अखंड सुरू आहे.

यंदा करोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला आहे. मोबाईलवरून अभ्यास पाठवून तो सोडऊन घेतला जात आहे. ऑनलाइन अभ्यास सुरू झाला असलातरी त्यासाठी फक्त मोबाईल नव्हेतर ऍन्ड्रॉइड मोबाईल असणे आवश्‍यक आहे. ज्यांच्याकडे असे मोबाईल आहेत, त्यांचा अभ्यास सुरू आहे. मात्र, ज्यांच्याकडे ऍन्ड्राइड मोबाईल नाहीत त्यांचे काय? हा प्रश्न निर्माण होत आहे. असा विचार गावातील प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उच्च पदस्थ काम करणारे शिवाजी ढवळे यांच्या डोक्‍यात आला. आणि त्यांनी दोन मोबाईल देण्याची तयारी दाखवत गरजू विद्यार्थ्यांची माहिती मागविली.

गरजूंची माहिती काढताना असे 16 विद्यार्थी समोर आले. मग एकाचे दोन करीत 13 दानशूर पुढे आले आणि या 13 जणांच्या दातृत्वातून 16 विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल रुपी ज्ञानगंगा पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश देणगीदार हे प्रतिकूल परिस्थितीत पायपीट करून आणि अनंत अडचणींचा सामना करून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचलेले आहेत. या मोबाईलचे वितरण दिवशी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले. यावेळी शिवाजी ढवळे, ठक्कर बाप्पा विद्यालयाचे प्राचार्य डी. जी. नांगरे, सरपंच संजय थोरात, माजी सरपंच आबासाहेब पाटील, जे. बी. सूर्यवंशी, डी. सी. पाटणकर, विष्णू सूर्यवंशी, उत्तम साळुंखे, एम. ए. सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, गंगाराम कुंभार, शैलेश कुंभार, प्रदीप थोरात, भिकाजी पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवशी बुद्रुकचे दानशुर दाते…
करोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे कोडे निर्माण झाले आहे. जेथे मोबाईलला नेटवर्क आहे तेथे ऍन्ड्रॉइड मोबाईल नाहीत आणि जेथे मोबाईल आहेत तेथे नेटवर्क नाही. अशा डोंगर पाटण तालुक्‍यतील दिवशी बुद्रुकच्या दानशूर पुढे आले आहेत. या दानशुरात शिवाजी ढवळे, विजय कारंडे, तुकाराम थोरात, शाम कुंभार, के एन कुंभार, मारुती कांबळे, प्रदीप सूर्यवंशी, बी जे पवार, अरुण सावंत, शरद सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, वसंत पाटील यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.