सातारा । पुसेगाव व कोरेगावातून तीन लाखांचा गुटखा जप्त

पुसेगाव (प्रतिनिधी) – कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावरून गुटखा व पान मसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकून 94 हजार 740 रुपयांचा, तर पुसेगाव पोलिसांनी पुसेगाव येथ सलूनच्या दुकानात छापा टाकून तेथे ठेवलेला एक लाख 98 हजार रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला.

कोरेगावचे पोलीस निरीक्षक पी. एम. मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक फौजदार पाटोळे, हवालदार झारी व वाघमळे यांना कुमठे फाटा येथे बिना नंबरप्लेटची मोटारसायकल अडवून गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी व तंबाखू, असा 94 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत या मोटारसायकलचा चालक जमील शफीक बागवान (रा. कळकाई गल्ली, कोरेगाव) याच्यावर अन्नसुरक्षा अधिकारी युवराज ढेंबरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुसेगाव येथेही अवैध गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी व तंबाखूचा अवैध साठा असल्याची माहिती मिळताच पुसेगावचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे व हवालदार मुल्ला यांनी सचिन ज्वेलर्सशेजारच्या सलूनच्या दुकानात अचानक छापा टाकला. तेथे एक लाख 98 हजार 632 रुपये किमतीचा गुटखा, आरएमडी पानमसाला, गोल्ड सेंटेड तंबाखूचा साठा आढळला. 

याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ संजय भिसे (रा. निढळ, ता. खटाव) व आनंदा रामचंद्र चव्हाण (रा. नेर, ता. खटाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.