मायणी – अनफळे (ता. खटाव) येथील दादासो रामू चव्हाण यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अनफळे येथील चव्हाण वस्तीतील दादासो रामू चव्हाण यांचे पत्रा, लाकूड, कुड व प्लॅस्टिक कागद वापरून तयार केलेले घर आहे. घरी पत्नी संगीता, मुलगा तुषार, सून व नातवंडासह ते राहतात. काल बुधवार सकाळी घरातील सिलेंडर संपला म्हणून चितळी येथील बालाजी गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस सिलेंडर आणला. सायंकाळी सहाच्या दरम्यान स्वयंपाक करण्यासाठी तो जोडला.
नेहमीप्रमाणे संगीता यांनी रात्री स्वयंपाक करून गॅस बंद केला. जेवण करून मका भरण्यासाठी घरातील अंगणात काम सुरू झाले. मका भरत असतानाच काहीतरी आवाज येत असल्याचे तुषार यांच्या लक्षात आले. ते पाहण्यासाठी घरात जात असतानाच अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर घरात तात्काळ आग भडकली.
या आगीत घरातील सोन्याचे साडेतीन ग्रॅमची दोन गंठण, कानातील दोन मुद्या, चमक्या व चांदीची दोन जोड पैजण, मका विकलेली 80 हजाराची रोख रक्कम, मोबाइल, टीव्ही, मिक्सर, तिजोरी, कुलर, फॅन, सहा पोती गहू, दोन पोती ज्वारी, रासायनिक खतांची दोन पोती, अंथरूण, पांघरूण व भांडी जळून खाक झाली. या घटनेत 6 लाख 33 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा तलाठी उत्तम चव्हाण यांनी केला. या घटनेची नोंद मायणी पोलिसांत झाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की घर पत्रा व लाकडी असल्याने पूर्ण उध्वस्त झाले. गॅस कंपनीने चव्हाण कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीय हताश झाले आहेत. दादा चव्हाण व मुलगा तुषार यांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानीचा अनर्थ टळला. तहसीलदार किरण जमदाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चव्हाण कुटुंबीयांना तातडीची मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाण कुटुंबीयांना मदतीची गरज…
गॅस सिलेंडरच्या स्फोटात चव्हाण कुटुंबीयांचा सर्व संसार उध्वस्त झाला असून त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. दानशूर व्यक्ती व संस्थांनी त्यांना वस्तू व आर्थिक स्वरूपात जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.