सातारा : जिल्ह्यातील घनदाट जंगलांची तोड,मानवी वस्तीत वाढलेला संघर्ष यामुळे बिबट्याच्या अधिवास क्षेत्राचे नुकसान होत आहे. साताऱ्यात खिंडवाडी येथे बिबट्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने पुन्हा एकदा बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा, आधुनिक पद्धतीच्या गुंगीचे इंजेक्शन मारणाऱ्या बंदुकांचा अभाव यामुळेच जीवघेणे धोके पत्करत वनविभागाला पारंपारिक उपायाची जोखीम पत्करावी लागत आहे.
वनविभागाच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवणे सोडून बिबट्यांच्या अधिवास विकासाचा ठोस कृतीयुक्त आराखडा बनवावा अशी अपेक्षा आहे .सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाटण, कराड, सातारा, जावली, महाबळेश्वर या पाच तालुक्यांमध्ये घनदाट जंगल आहे. जागतिक दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटाचा 45 टक्के भाग सातारा सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो .येथील जंगल तोड अनेकदा बिबट्याला मानवी वस्तीच्या जवळ आणते. साताऱ्याचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर खिंडवाडी परिसरात जखमी बिबट्याने हल्ला केला यामुळे या सर्व उपायांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
बिबट्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार करणे हे महत्त्वाचे काम आहे. मात्र वनविभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज त्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ते शक्य झालेले नाही .बिबट्याचा अधिवास पुर्नसंचयित करणे ग्रीन कॉरिडोर ची निर्मिती करणे बिबट्याची शिकार प्रतिबंधित करणे मानव व बिबट्या संघर्ष कमी करणे या उपायांवर वनविभागाला काम करावे लागणार आहे. बिबट्याला आधार देण्यासाठी झाडे लावणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
वनविभागाने झाडे लावताना बहुतांश तालुक्यामध्ये शासकीय अनुदान लाटण्याचा आरोप झाला आहे. परळी कराड तसेच जखिनवाडीच्या डोंगरांमध्ये बिबट्याचा झालेला वावर आणि तेथील प्राण्यांवर झालेले हल्ले हे अगदी अलीकडच्या घटना आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या भागातील चार बिबट्यांनी 15 जनावरांचा फडशा पडल्याचे वृत्त आहे.
साताऱ्यातही हवे माणिक डोह केंद्र
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माणिक डोह बिबट केंद्राच्या धरतीवर सातारा जिल्ह्यातही बिबट्याचे पुनर्वसन केंद्र असावे अशी मागणी आहे राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील माणिक डोह येथे बिबट्याचे पुनर्वसन आणि निवारण यासाठी स्वतंत्र केंद्राची निर्मिती केली आहे येथे 37 बिबट्या आहेत त्याच धर्तीवर पाटण अथवा जावली तालुक्यातील सुरक्षित ठिकाणी वन विभागाने अशा केंद्राची निर्मिती करून त्या केंद्रामध्ये प्रशिक्षित प्राणी तज्ञांच्या निगराणीखाली बिबट्यांचे पुनर्वसन करावे आणि सुरक्षित अधिवासासाठी वनविभागाने ठोस कार्यक्रम राबवावा अशी प्राणी प्रेमींची मागणी आहे