सातारा – सातारा जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सोमवारी या रोगाचा पहिला बळी गेला आहे. वाघेरी (ता. कराड) येथील बैलाचा लंपी स्किनने मृत्यू झाला आहे. फलटण, कराड, सातारा, खटाव या चार तालुक्यात 72 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली असून पशुसंवर्धन विभागाकडून परिसरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. सातारा जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये आजअखेर 72 जनावरांना लंपी स्कीनची बाधा झाली आहे. लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून त्यानुसार जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. फलटण तालुक्यातील खामगांव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी, पाडेगाव व सातारा तालुक्यातील महागांव, कोडोली (पांढरवाडी ), खटाव तालुक्यात अनपटवाडी व मानेवस्ती कराड तालुक्यात वाघेरी अशी 10 गावास लागण झाली आहे. जिल्ह्यात 72 जनावरांना लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
वाघेरी (ता. कराड) येथील लंपी स्किन झालेल्या बैलाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, प्राण्याच्या शर्यती व वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. लंम्पी त्वचा रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा टोल फ्री क्र. 18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.