सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम 2023-24 साठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक कार्यक्षमतेचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (बेस्ट टेक्निकल इफिशियन्सी अॅवॉर्ड) जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा उद्या, दि. 23 रोजी होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सर्व बाजूंनी उभारी घेतलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात काटकसरीचे धोरण आणि मूल्यवर्धित उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत.
अनेक अडचणींवर मात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातसुद्धा आदर्शवत आहे. कारखान्यास गळीत हंगाम 2023-24 साठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तांत्रिक कार्यक्षमतेचा दक्षिण विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कारखान्याने आजवर अनेक पुरस्कार पटकवले आहेत. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, या पुरस्काराने कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक, विभागप्रमुख उपस्थित होते.