सातारा : शेतकर्यांनी एकत्र येऊन, आरोग्यसंपन्न सेंद्रिय शेती करावी आणि दर्जेदार उत्पादन घ्यावे, असे आवाहन उद्यानविद्या शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम शेळकेवाडी (ता. सातारा) येथे नुकताच झाला.
त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक व सेंद्रिय शेती म्हणजे काय? शेतीमध्ये कीड व रोग संरक्षण आणि जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, याविषयी यादगीरवार यांनी मार्गदर्शन केले. जीवामृत, बीजामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निमाश्र, ब्रह्मास्त्रसाठी लागणार्या निविष्ठा कशा तयार करायच्या, त्यांचा वापर कसा करायचा याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.
शेतकर्यांनी गटामार्फत मोहीम यशस्वी करावी, जेणेकरून जमीन व मानवी आरोग्य संवर्धन होईल, अशी आशा आत्मा प्रकल्प उपसंचालक राहुल माने यांनी व्यक्त केली. नैसर्गिक शेती करणार्या शेतकर्यांना आत्माकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
आपला शेतीमाल कसा पिकवायचा, यावर भर देताना शेतकर्यांसाठी हे प्रशिक्षण फार महत्त्वाचे आहे असे मत तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी व्यक्त केले. कृषी सहाय्यक सौ. हेमा फडतरे यांनी जीवामृत, दशपर्णी अर्क व वेस्ट डीकम्पोजर तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कृषी पर्यवेक्षक प्रवीण नलावडे यांनी शेतकर्यांना माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणास महिला बचत गटांच्या सदस्या, नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी उपस्थित होते. संभाजी शेळके यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आभार मानले.