चिंब भिजायचयं…. चला साताऱ्याला…

श्रीकांत कात्रे

पावसाळा आला, की हिरव्यागार स्वप्नांचे जग डोळ्यांपुढे दिसू लागते. या वर्षी पावसाने जूनमध्ये दडी मारली तरी जुलैमध्ये बऱ्यापैकी हजेरी लावली. थोडी उघडीपही दिली. गरजेएवढ्या पावसाने सारे हिरवेगार झाले आहे. आणि त्यामुळेच आता बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा खजिना प्रत्येकाला खुणावू लागलाय. असा आनंद देणारी आपल्याजवळची सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणे आपल्याला हाक मारतात. त्यावेळी आपणच प्रतिसाद द्यायला हवा, तोही आपल्याच आनंदासाठी…!

निसर्गरम्य कोयना परिसर
काय पाहणार, काय करणार…

कोयना धरणाच्या परिसरात पावसाची मजा लुटण्याचा आनंद!
पाटणकडून कोयनानगर रस्त्याच्या डाव्या बाजूला दुथडी भरून वाहणारी कोयना.
हिरवाई ल्यालेले डोंगर, रिमझिम पडणारे पावसाचे थेब अचानक टपोरे होताना अंग ओलं करून टाकणारं वातावरण.
कोयना धरण 105 टीएमसी क्षमता. धरणातील पाणीसाठ्यावर वीजनिर्मिती करणारे प्रकल्प.
नेहरू स्मृती उद्यान पर्यटकांचे आकर्षणस्थळ. पक्ष्यांची चित्रे, कृत्रिम झाडे, लहान मुलांसाठी खेळणी.
उद्यानातील यशोगाथा माहिती केंद्रात दृकश्राव्य चित्रफितीतून धरण, विद्युतनिर्मितीची माहिती.
कोयना अभयारण्यातील गर्द वनराई, वाघांपासून अस्वल, सशांपर्यंतच्या सर्व प्राण्यांचा वावर.
अभयारण्य पाहण्यासाठी ऑक्‍टोबर ते जूनपर्यंतचा कालावधीे. वनविभागाची परवानगी आवश्‍यक.
साताऱ्यापासून कोयनानगर सुमारे शंभर किलोमीटर. खासगी वाहने, एसटी बसची सुविधा. अभयारण्यासाठी कोयनानगर व बामणोली येथून लॉंच.
निवास व्यवस्था ः कोयनानगर येथे एमटीडीसी, खासगी लॉज, तसेच शासकीय विश्रामगृह.

भारदस्त सज्जनगड
काय पाहणार, काय करणार…
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक महत्त्वाचे ठिकाण.
सतराव्या शतकातील स्थापत्य कलेची उत्तम नमुना असणारी छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार व समर्थ द्वार,
श्रीराम घळ, तळे, शेजघरात समर्थांच्या वापरण्याच्या अनेक वस्तू आणि पाण्याचे मोठे हंडे आहेत. श्रीराम मंदिर, मारुती मंदिर, समर्थांचे समाधीस्थान.
साताऱ्यापासून सुमारे 16 किलोमीटर. साताऱ्यातून एसटी बससेवा, खासगी वाहनांच्या फेऱ्या. गडाच्या मध्याहून जास्त उंचीपर्यंत वाहनाने. तेथून 600 मीटर पायऱ्या. परळी गावातूनही गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. विनाशुल्क राहण्याची आणि जेवणाची सोय.


वाईचा बहारदार परिसर
काय पाहणार, काय करणार
धार्मिक स्थळ, दक्षिण काशी म्हणून परिचित. पेशवेकालीन रचना असणारे टुमदार गाव.
महागणपती मंदिर, विश्वकोश कार्यालय, प्राज्ञ पाठशाळा, कृष्णा तीरावरील घाट, धोम धरण, मांढरदेव येथील काळेश्वरी देवीचे मंदिर, सोनजाई डोंगरावरील मंदिर, मेणवली येथील नाना फडणवीस यांचा वाडा, मेणवलीचा चंद्रकोरीच्या आकाराचा घाट व मंदिरे आणि 100 किलो वजनाची धातूची घंटा. धोम- बलकवडी धरणाचा निसर्गरम्य परिसर.
सातारा ते वाई- 32 किलोमीटरचा प्रवास. एसटी बसेस, खासगी वाहने.
निवास व भोजनव्यवस्था- विश्रामगृह व खासगी हॉटेल्स.

यवतेश्वरचे प्राचीन मंदिर
काय पाहणार, काय करणार…
यवतेश्वर येथे शंकर व भैरवनाथाचे प्राचीन मंदिरे. मंदिराच्या पश्‍चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे, सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी.
डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्‍य व अजिंक्‍यताऱ्याची दर्शनी बाजू.
सातारा शहराच्या पश्‍चिमेस सुमारे दहा किलोमीटर अंतरावर.
साताऱ्यात राहण्याची सोय. साताऱ्यातून अर्ध्या तासाला एसटी बससेवा, तसेच खासगी वाहने.

कासची दुर्मीळ वनसंपदा
काय पाहणार, काय करणार…
गर्द हिरव्या झाडीने नटलेला तलाव पर्यटकांचे आकर्षण. विस्तीर्ण पठार, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त वातावरण.
सातारा- कास रस्त्यावर गणेशखिंडीत रस्त्याच्या डाव्या बाजूस उरमोडी, तर उजव्या बाजूस कण्हेर जलाशयाचे विहंगम दृश्‍य.
कास पठारावरून गर्द झाडीच्या कुशीत विसावलेला कास जलाशय.
कास पठारावर ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात उमलणारी दुर्मीळ रानफुले.
सातारा ते कास 26 किलोमीटर. साताऱ्यातून एसटीची सोय आहे. निवास व विविध खासगी हॉटेल्स व रिसॉर्टस.

 

पाचगणीचे टेबललॅंड
काय पाहणार, काय करणार…
थंड हवेचे ठिकाण, आकाशाला गवसणी घालणारी सिल्वर ओकची झाडे, दुर्मीळ वनस्पती, निवासी शाळा, स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी फळे.
आशियात प्रसिद्ध असणारे पठार- टेबल लॅंड
सिडनी पॉईंट, बेबी पॉईंट, पारसी पॉईंट, अवतार मेहेरबाबाच्या गुहा, शेरबाग, राजापुरी येथील कार्तिक स्वामींच्या गुहा.
सातारा ते पाचगणी- 58 किलोमीटर. एसटी बसेस, खासगी वाहने, टॅक्‍सी.
निवास व भोजन व्यवस्था- विश्रामगृहे, खासगी हॉटेल्स, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे निवास. सर्व हॉटेल्समध्ये भोजन.

महाबळेश्वरचे निसर्ग आविष्कार
काय पाहणार, काय करणार…
थंड हवेचे ठिकाण, सदाहरित जंगल, निसर्गाच्या विविध चमत्कारांचा आविष्कार.
डोंगरदऱ्या, दाट झाडी, खळाळणारे निर्झर, आल्हाददायी वातावरण.
श्री क्षेत्र महाबळेश्वर (पाच नद्यांचा उगम), आर्थरसीट पॉईंट, केटस पॉईंट, बॉंबे पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट, लॉडविक पॉईंट, प्रतापगड.
नौकाविहारासाठी वेण्णा लेक. लिंगमळा, चायनामन व धोबी असे तीन धबधबे
सातारा ते महाबळेश्वर 65 किलोमीटर. पुणे, मुंबईसह विविध ठिकाणांवरून बससेवा, खासगी वाहने, टॅक्‍सी.
निवास व भोजन व्यवस्था- महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची निवास सुविधा. खासगी हॉटेल्स. बहुतेक हॉटेल्समध्ये भोजन व्यवस्था.

वनकुसवडे पवनचक्‍क्‍यांचे जंगल
काय पाहणार, काय करणार…
ठोसेघर, चाळकेवाडी व वनकुसवडे परिसरातील पठारावर पवनऊर्जा प्रकल्पात सुमारे तीन हजार पवनचक्‍क्‍या.
पावसाळ्यात धुक्‍यांनी भरलेला परिसर, विस्तीर्ण पठारावर उंच पवनचक्‍क्‍यांची फिरणारी अजस्त्र पाती, सोसाट्याचा वारा.
सातारा ते ठोसेघर- 30 किलोमीटर. एसटी बससेवा, खासगी वाहने. निवास व भोजन व्यवस्था नाही.

ठोसेघरचा धबधबा
काय पाहणार, काय करणार…
तारळी नदीच्या उगमावर ठोसेघर गावानजीक भलामोठा धबधबा. तसेच काही छोटे धबधबे आकर्षक. निसर्गाची मुक्त उधळण
पावसाळी पर्यटकांचे आकर्षण. वन विभागाचे माहिती केंद्र, जग्मीन धरण.
धबधबा आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी वन विभागाची निरीक्षण गॅलरी
साताऱ्यापासून पश्‍चिमेस सुमारे 30 किलोमीटर. एसटी बससेवा, खासगी वाहने. निवास भोजन व्यवस नाही.
घ्यावयाची काळजी- संरक्षक रेलिंगच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नको. पाण्यामध्ये शेवाळे असल्याने घसरण्याची भीती.

बामणोलीचा नौकाविहार
काय पाहणार, काय करणार…
कोयना धरणाचा पाणीसाठा शिवसागर जलाशय, नौकाविहाराची सोय, उंच डोंगरकडे, गर्द अभयारण्य.
डोक्‍यावर निळे आकाश आणि खाली अथांग निळाशार जलाशय हे दृश्‍य, जवळच तापोळा पर्यटनक्षेत्र.
जलाशयापलीकडे वासोटा किल्ला व कोयना अभयारण्याचा अंतर्गत भाग.
शिवसागर बोट क्‍लबतर्फे पाचशे ते दीड हजार रूपयांत नौकाविहाराची सोय.
सातारा ते बामणोली- 35 किलोमीटर. साताऱ्यातून एसटी बस, खासगी वाहने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)