दहिवडी : सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यावर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले.
उर्किडे (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केलेल्या बांधकाम ठेकेदाराचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दहिवडी उपविभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव (वय ५४, रा. दहिवडी) यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
यापैकी १५ हजार रुपये लाच रक्कम खाजगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे (वय ६१, रा. बिदाल, ता. माण) यांच्यामार्फत पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालयात स्वीकारली. त्यामुळे भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्याविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेश वाघमारे, हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे व गणेश ताटे यांनी ही कारवाई केली.