कोरेगाव : शहरातून जाणाऱ्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्य मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम नगरपंचायत आणि पोलीस दलाने संयुक्तपणे गुरूवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केली. या मोहिमेमुळे फेरीवाल्यांसह व्यापारी आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली विनायक पडवळ, शेखर बर्गे, अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाली होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. आझाद चौक, जुनी भाजी मंडई परिसरातील फळांचे गाडे हटविण्यात आले. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून ते नगरपंचायतीच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले. तिथून जुन्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात नेऊन ठेवण्यात आले. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेले फलक, जाहिरात फलक आणि साहित्य उचलून नेण्यात आले. बहुतांशी ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व मुख्याधिकारी विनोद जळक हे फेरीवाल्यांची समजूत घालून त्यांना नियम व अटींची माहिती देत होते.
अतिक्रमण आढळल्यास कारवाई होणारच
महामार्गावर आणि राज्य मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याचे उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आले आहे. आज सुद्धा व्यावसायिकांना समज देण्यात आली आहे, मात्र यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्य मार्गावर अतिक्रमण होऊ देणार नाही. अतिक्रमण केल्याचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.