लादेवाडी नागरीकांची मागणी; आंदोलनाचा इशारा
शिराळा (प्रतिनिधी) – लादेवाडी, ता. शिराळा येथील सरपंच व पोलीस पाटील यांनी संगनमताने करून आतिक्रमण केले आहे. ते काढून घेण्याबाबत प्रत्यक्ष तहसीलदार यांनी पहाणी करून आदेश देऊन देखील ते काढण्यात आलेले नाही. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मनमानी केल्याच्या कारणास्तव सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे इशारा लादेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लादेवाडी गावातील पेटकर व पोकलेकर पाणंद रस्ता आहे. हा रस्ता गाव नकाशामध्ये आहे. सरपंच रमेश राजाराम पोकलेकर व अमर बबन पोकलेकर यांनी पत्नी पोलीस पाटील असताना संगनमताने पाणंद रस्त्यावर जनावरांचे शेड उभारले आहे. यामुळे शेतकऱ्यांना या रस्त्यावरून रहदारी करता येत नाही.
शेकडो शेतकऱ्यांना यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याबाबत दि. 6 मे 2018 रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार शिराळा यांना निवेदन दिले त्यानुसार दि. 19 जून 2018 रोजी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत आदेश दिले आहेत. यावेळी सरपंच, पोलीस पाटील यांनी अतिक्रमण काढून घेतो, असे सांगितले. परंतु, जाणीवपूर्वक अतिक्रमण आज अखेर काढून घेतलेले नाही. त्यांनी पदाचा गैरवापर केला असून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी.