आ. महेश शिंदे यांनी केली स्वनिधीतून उभारणी
खटाव (प्रतिनिधी) – खटाव-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी स्वनिधीतून उभारलेल्या शंभर खाटांच्या श्री काडसिद्धेश्वर कोविड केअर सेंटरचे लोकार्पण गृह (ग्रामीण), वित्त व पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. या हॉस्पिटलसाठी आ. महेश शिंदे यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मतदारसंघात आता अधिक ताकदीने व अशाच पद्धतीने विकासकामे करणार आहे. करोना काळात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मागणीसाठी प्रयत्न करणार आहे. ना. शंभूराज देसाई यांनीही यात गांभीर्याने लक्ष घालावे, असे आ. महेश शिंदे म्हणाले. मुकुंद आफळे, सुनील खत्री यांनी मनोगत व्यक्त केले.
कोरेगाव येथील जीतराज मंगल कार्यालयात उभारलेल्या या सेंटरच्या उद्घाटनास नगराध्यक्ष श्रीमती कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार रोहिनी शिंदे, गटविकास अधिकारी श्रीमती बोराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, डॉ. करपे, डॉ. चिवटे, डॉ. काळोखे, डॉ. अरुणा बर्गे, विजया घाडगे, किरण बर्गे, रमेश उबाळे, राहुल बर्गे, संग्राम बर्गे उपस्थित होते.
सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या या सेंटरच्या उभारणीसाठी गेल्या महिनाभरापासून आ. शिंदे, डॉ. प्रिया शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आभार मानले.