म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेने आम्ही रहात असलेले घर व जागा ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत दोन दिवसांत राहते घर खाली करण्याची नोटीस देऊन आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करत येथील लोहार कुटुंबाने पालिका विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत लोहार कुटुंबियांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आम्ही १९७० सालापासुन येथील हायस्कुल विद्यालयाशेजारी रहात आहे. याठिकाणी आता या कुटुंबाची तिसरी पिढी रहात आहे. या कुटुंबाने १९९२ साली पालिकेकडे सदरच्या जागेवरील आपल्या घराची नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केलेला असून पालिकेने व भुमी अभिलेख कार्यालयाने आजवर त्याची नोंद केलेली नाही. मात्र, वीज कनेक्शन घेण्यासाठी मात्र पालिकेने ना हरकत पत्र दिलेले आहे.
शासनानेही १९९५ पुर्वीच्या सरकारी जागेवरील घरांना रितसर करुन घेण्याचा अद्यादेश काढलेला आहे असे असताना आमचे घर बेकायदेशीर असल्याचा पालिका प्रशासनाने आरोप करत आम्हाला दोन दिवसांत घर खाली करण्याचे नोटीस बजावले आहे.
वास्तविक शासन एकीकडे भुमीहिनांना हक्काचे घर देण्यासाठी नव नवीन योजना राबवत आहे तर दुसरीकडे याच प्रशासकीय अधिकारी गरीब कुटुंबाला निराधार व बेघर करत आहे. पालिका प्रशासनाने दिलेली नोटीस माघारी घ्यावी व आमच्या घराची नोंद पालिकेच्या दप्तरी करावी, अशी मागणी लोहार कुटुंबाने केली आहे.
संपूर्ण गट शासकीय मालकीचा
यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी डॉ. सचिन माने म्हणाले, संपूर्ण गट हा शासकीय भुखंड असून त्यावर आरक्षण आहे. लोहार कुटुंब ज्या गटामध्ये रहात आहे तो ४८६ संपूर्ण गट शासकीय मालकीचा आहे, त्यांच्याकडे याचा ७/१२ अथवा सि.स. ची नोंद नाही. अशी नोंद फक्त खाजगी जागाची होते, सदरच्या जागेवर शासकीय आरक्षण असुन याठिकाणी सध्या मल्टीपर्पज हॉल उभारणीचे काम सुरु असल्यानेच या कुटुंबाला नोटीस देण्यात आले आहे.