Satara Crime: मिरचीच्या व्यवहारात ‘तिखट’ झटका! सातार्यातील व्यापाऱ्याला तब्बल २० लाखांचा गंडा
Satara Crime: काश्मिरी बेडगी मिरची खरेदीच्या नावाखाली २० लाखांची ठकबाजी; जीएसटी पोर्टलवरील तपासणीने उघड केली कर्नाटकातील व्यापाऱ्याची बनावट पावती.

Satara Crime – मिरची खरेदीसाठी आगाऊ रक्कम घेतल्यानंतर माल न पाठवता बनावट जीएसटी बिल दिल्याचा आरोप करत 19 लाख 93 हजार 732 रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कर्नाटकातील व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतापगंज पेठ येथील मसाले व्यापारी संतोष सुरेशलाल सारडा (वय 47) यांनी ब्याडगी येथील ‘ए.के. कुंडगोल’ दुकानाचे मालक शोएब कुंडगोल यांच्याकडून 400 पोती काश्मिरी बेडगी व संकेश्वरी मिरची मागविण्यात आली होती.
त्यासाठी 1 डिसेंबर 2025 रोजी 5 लाख, 14 डिसेंबर रोजी 9 लाख आणि 19 डिसेंबर रोजी 5 लाख 53 हजार 732 रुपये, अशी एकूण 19 लाख 53 हजार 732 रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवली होती. मात्र रक्कम दिल्यानंतरही शोएब कुंडगोल यांनी मिरचीचा माल पाठवला नाही. दरम्यान, माल खरेदी करून तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचे बिल शोएब कुंडगोल यांच्याकडून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले.
मात्र, संतोष सारडा जीएसटी पोर्टलवर तपासणी केली असता संबंधित बिलाची नोंदच नसल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे बनावट बिलाच्या आधारे फसवणूक केल्याचा आरोप संतोष सुरेशलाल सारडा यांनी शोएब कुंडगोल यांच्यावर केला आहे. याप्रकरणी शोएब कुंडगोल यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.




