सातारा । करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रत्येक तालुक्‍यात 30 खाटांचे करोना केअर सेंटर

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात तीन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बेडस्‌ची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात 30 बेडस्‌ची करोना केअर सेंटर्स (सीसीसी) पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. तेथील कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पुढील एक वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

गेल्या वर्षी करोनाचे संकट सुरू झाल्यानंतर मार्च ते सप्टेंबर या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये बेडस्‌ उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने करोना केअर सेंटर्स सुरू केली होती. त्यामध्ये बाधित व संशयित रुग्णांना उपचारांसाठी सुविधा दिल्या जात होत्या. 

या सेंटरसाठी आरोग्य विभागाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी नेमणूक दिली होती. प्रत्येक सेंटरमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, सहा नर्स, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा ऑपरेटर, कक्ष सेवक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही केंद्रे पुन्हा सुरू करून तेथील 68 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मार्चपासून करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानंतर ऑक्‍टोबर ते यंदा जानेवारीपर्यंत रुग्णसंख्या कमी झाली; परंतु फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून करोनाशी लढण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहे. सद्य स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात एक सेंटर सुरु करण्यात आले आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी करोना सेंटर्स वाढविण्यात येणार आहेत.
– डॉ. अनिरुद्ध आठल्ये

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.