सातारा: मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयाला आ. शिवेंद्रराजे देणार डिजिटल एक्‍स-रे मशीन


सातारा (प्रतिनिधी) –
जावळी तालुक्‍यात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून मेढा ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. या केंद्रासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी डिजिटल एक्‍स-रे मशीन भेट देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात करोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती आहे. जावळी तालुक्‍यातही अशीच परिस्थिती असून आ. शिवेंद्रराजे व प्रशासनाच्या निर्णयानुसार मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. तेथे ऑक्‍सिजन यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निधीची कमतरता असल्याने या केंद्रासाठी डिजिटल एक्‍स-रे मशीन घेणे प्रशासनाला शक्‍य नाही. ही बाब समजल्यानंतर आ. शिवेंद्रराजे यांनी हे मशीन देण्याची ग्वाही तहसीलदार पाटील यांना दिल्याने मोठा प्रश्‍न सुटणार आहे.

बाधिताच्या छातीचा एक्‍स-रे या डिजिटल मशीनद्वारे काढला जातो. त्यातून रुग्णाला न्यूमोनिया झाला आहे का किंवा रुग्णाला झालेला विषाणू संसर्ग कोणत्या टप्प्यात आहे, याची माहिती मिळते. त्यावरून पुढील उपचार वेगाने केले जातात. त्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये डिजिटल एक्‍स-रे मशीन अत्यावश्‍यक आहे. मेढ्यात सुरू होणाऱ्या सेंटरसाठी आ. शिवेंद्रराजे यांच्या वतीने हे मशीन भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची आणि वैद्यकीय पथकाची मोठी गैरसोय दूर होणार आहे. हे कोविड केअर सेंटर लवकरात लवकर रुग्णांसाठी खुले करा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.